एखाद्या सुंदर तसेच कमावत्या मुलीशी प्रेम करून तिच्यासोबत आयुष्य घालविण्याच्या थापा देत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा प्रेम प्रकरणांमध्ये विजातीय तरुण-तरुणी एकत्र येऊन लिव्ह इन रिलेशनशिप या गोंडस नावाखाली स्वतःचे जीवन बरबाद करून घेत आहेत . असे प्रकार रोखण्यासाठी पुन्हा एकदा कठोर कायद्याची मागणी जोर धरू लागली आहे.आफताब व श्रद्धा प्रकरणावरून धर्मांतरबंदी कायद्याची गरज पुन्हा एकदा वाटू लागली आहे.
वरून वरून हे प्रेम वाटत असले तरी यामागे काही जातीयवादी संघटना असल्याचा संशय बळावत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात जातीयवादी डावपेच आखले जात असल्याचे अनेक घटनांवरून दिसून येत आहे. मराठवाड्यात मात्र लव्ह जिहादला बंदी घालून धर्मांतरबंदी कायदा अंमलात आणावा यासाठी विश्व हिंदू परिषद तसेच इतर धार्मिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात यासाठी निवेदन तसेच मोर्चे काढून शासनाचे लक्ष वेधण्याचे काम सुरू आहे. परभणी ,नांदेड, बीड, औरंगाबाद ,जालना यासह हिंगोलीमध्ये देखील विश्व हिंदू परिषद या मागणीसाठी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. तालुकास्तरावर तहसीलदार तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या संदर्भात धर्मांतरबंदी कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
आफताबने श्रध्दा या हिंदू तरूणीची निर्घुन हत्या केली. श्रद्धाची हत्या करून ३५ तुकडे करणा-यास फासावर लटकवावे, राज्यात लव्ह जिहाद व धर्मांतरबंदी कायदा अंमलात आणावा , यासाठी पुन्हा एकदा अनेक धार्मिक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. विजातीय तरुण हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून राक्षसी जाळे पसरवित आहेत .धर्मांद लव्ह जिहादी व रोडरोमियोंचा तत्काळ बंदोबस्त करावा , अशी मागणी विश्व हिंदू परिषद व सर्वपक्षीय पदाधिकारी मराठवाड्यात निवेदनाद्वारे करत आहेत.
श्रध्दा ह्या हिंदू तरूणीची लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून निर्घुन हत्या करण्यात आली. हा आपल्या देशात नवीन किंवा पहिला प्रकार नाही . अशा घटना नेहमीच घडत आहेत. समाजही अशा घटनांकडे पाहतो व काही दिवसानंतर त्या गोष्टीचा समाजाला विसर पडतो. देशभरात हिंदू तरूणींना अमिष दाखवून किंवा प्रेम प्रकरणात अडकवून त्यांना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडवकले जाते, अशा पिडीत हिंदू तरूणींना धर्मांतर करण्यास भाग पाडले जाते. धर्मांतराचा विरोध करणा-या हिंदू तरूणींची हत्या केली जाते किंवा वाम मार्गास लावले जाते.
त्या करीता लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा तत्काळ अंमलात आणावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येत आहे. मराठवाड्यात लव्ह जिहादचे अनेक प्रकरण यापूर्वी समोर आले आहेत. असाच एक प्रकार नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात काही दिवसापूर्वी उघडकीस आला.या प्रकरणी हिंदूत्ववादी तरुणांनी पोलीस प्रशासनाच्या मदतीने त्या तरूणीस सुखरूप परत आणले. असे प्रकार मराठवाड्यात पुन्हा होऊ नयेत यासाठी अशा प्रकरणाच्या मुळाशी कोण आहेत व या लव्ह जिहादींना अर्थिक रसद पुरवणारे शोधून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी जोर करत आहे.
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात व तालुका स्तरावर शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, बसस्थानक परिसरात रोडरोमीयोंनी उच्छाद मांडला आहे. शिक्षणासाठी शहरातील व ग्रामीण भागातुन येणा-या विद्यार्थीनीची छेड काढल्या जात आहे, अशांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पालक वर्गातून व महिला मुलींमधून होत आहे. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात अशा प्रकारच्या समस्यांचा उल्लेख करण्यात येत आहे. अशी प्रकरणे थांबविण्याच्या दृष्टीने तालुक्यातील महिला, मुली, विद्यार्थीनी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दामिनी पथक किंवा चिडीमार पथक स्थापन करून रोडरोमियोचा बंदोबस्त करावा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने निवेदनाद्वारे केली आहे. श्रद्धा प्रकरण किंवा मुलींची छेडछाड असे प्रकार चालु राहिल्यास हिंदूत्ववादी संघटनेच्यावतीने समाजविघातक तरुणांचा बंदोबस्त केला जाईल , असा इशारा देण्यात आला आहे. सामाजिक संघटना अशा प्रकरणांसाठी पुढाकार घेत असले तरी पालकांनी सजग राहणे अतिशय आवश्यक आहे. सध्या अशा प्रकारच्या कायद्याची मागणी मराठवाड्यातच नव्हे तर राज्यात व देशपातळीवर गरजेची आहे . परंतु खरोखरच असे कायदे होऊन आफताब व श्रद्धा सारखे प्रकरण थांबणार आहेत का?
महिला व मुलींकडे पाहण्याचा समाजाचा विशेषतः पुरुष प्रधान संस्कृतीचा दृष्टिकोन कधी बदलणार याचे उत्तर कोणीच देऊ शकणार नाही. औरंगाबाद मध्ये संशोधक विद्यार्थ्यांने स्वतःला पेटवून घेऊन सोबतच्या संशोधक विद्यार्थिनीला पेटवल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत संबंधित विद्यार्थी व विद्यार्थिनी भाजून गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर उपचारही सुरू आहेत .परंतु प्रेम प्रकरणातून झालेला हा प्रकार समाजाला अतिशय लाजिरवाणीपणे मान खाली घालविणारा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थिनी शासकीय विज्ञान संस्थेतील जीव भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापकांना भेटण्यासाठी गेली होती .त्यावेळी हा प्रकार घडला. उच्च विद्या विभुषित असणाऱ्या मुलांकडून असे प्रकार होत असल्याने आपला समाज कुठे भरकटत जात आहे ? हे न सुटणारे कोडे आहे.
मोठ्या शहरात आई वडील दोघेही नोकरीवर जातात , का तर स्वतःच्या मुलांना घडविण्यासाठी तसेच त्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी खूप पगार हवा, खूप पैसे हवेत . यामुळे आई वडील दोघेही घराबाहेर असतात. स्वतः पैसे कमविण्याच्या नादात आपली पोटची पोर काय करत आहेत? ते कोणत्या वळणावर आहेत? याकडे पालकांचे दुर्लक्ष होते. प्रत्यक्षात आपली मुलेच सगळ्यात मोठी संपत्ती आहे. त्यांना घडविणे, त्यांच्याकडे लक्ष देणे यापेक्षा मोठे काहीच असू नये. मुंबई , पुणे या मोठ्या शहरात राहणाऱ्या पालकांना ज्यावेळी ही गोष्ट लक्षात येईल त्यावेळी लव्ह जिहाद किंवा आफताब आणि श्रद्धा यासारखे प्रकरण थांबतील.
अभयकुमार दांडगे, नांदेड, मराठवाडा वार्तापत्र abhaydandage@gmail.com