सदानंद बाबा महाराज यात्रेनिमित्त तीन दिवस धार्मिक कार्यक्रम
उमरी। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार परमपूज्य समाधान महाराज शर्मा (केज) यांचे दिनांक 12 नोव्हेंबर रोज शनिवारी सायंकाळी सात वाजता उमरी शहरात भव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील सद्गुरु सदानंद बाबा महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या 98 व्या वर्षानिमित्त उमरी शहरात दिनांक 11, 12 आणि 13 नोव्हेंबर तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सकाळी काकडा आरती, अभिषेक, सायंकाळी चार वाजता लातूर जिल्ह्यातील प्रसिद्ध कीर्तनकार प्रशांत महाराज खानापूरकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सकाळी काकडा आरती, अभिषेक, समाराधना व रात्री सात वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांचे भव्य कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
तसेच दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता उमरी शहराच्या मध्यवर्ती रस्त्याने सद्गुरु सदानंद बाबा महाराज यांची पालखी मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप केल्या जाईल. या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानाधिपती अरविंद महाराज यांनी केले आहे.