नांदेड/हिमायतनगर, अनिल मादसवार| परतीच्या पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील उर्वरित पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा फटका नांदेड जिल्ह्यासह हिमायतनगर तालुक्यातील गावागावात बसला आहे. विजयादशमीच्या दिवशीपासून दररोज विजांच्या गडगडाटात पाऊस पडत आहे. आज बुधवारी सायंकाळी सुद्धा ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात भर पडली आहे.
हिमायतनगर शहरासह तालुक्यातील अनेक गावच्या शेतशिवारात पाणी साचून राहिले आहे. सध्या सोयाबीन काढणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान जोरदार पाऊस होत असल्याने काढलेले सोयाबीन भिजून उर्वरित शेतकऱ्यांचे पीकही नुकसानीत येण्याची शक्यता निर्मण झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. तालुक्यातील बहुतांश ठिकाणी कापून ठेवलेल्या सोयाबीनला मोड फुटत आहेत. त्यामुळे खरीप हंगामात बियाण्यासाठी केलेला खर्चही निघणेही कठीण हाेणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर, सिरंजनी, हिमायतनगर, सरसम, सवना, बोरगडी, धानोरा, घारापूर, डोल्हारी, कामारी, पोटा, मंगरूळ, वारंगटाकळी, सिरपल्लीसह अनेक गावांतील शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला आहे. तसेच हदगाव, निवघा, तामसा, वारंगा, यासह किनवट तालुक्यातील शिवणी, जलधारा या मंडळात दोन दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला. माहूर, भोकर, अर्धापूर इतर तालुक्यातील पिकांचीही परिस्थिती सारखीच आहे. सोयाबीन काढण्याच्या अवस्थेत असताना पाऊस होत आहे. अशाच पद्धतीने पाऊस होत राहिला तर सोयाबीन काढण्याला उशीर होऊ शकतो व त्यामुळे शेंगा जागीच फुटण्याची शक्यता आणि पावसाने भिजून कोंब फुटून उत्पादनात घाट निर्माण होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.