महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडून अभिनंदन -NNL


मुंबई|
महाराष्ट्राच्या क्रीडा संघातील खेळाडूंनी तब्बल १४० पदकांची कमाई करुन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजवत पदक तालिकेत दुसरे स्थान मिळवून महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी अभिनंदन केले.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, या घ‌वघवीत यशात खेळाडूंच्या अपार मेहनतीबरोबरच महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचाही मोलाचा वाटा आहे. केरळ येथे २०१५ मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा झाल्यानंतर सात वर्षांच्या खंडानंतर गुजरात मध्ये या स्पर्धा पार पडल्या. ३६ क्रीडा प्रकारांत सात हजार खेळाडूंनी आपले कौशल्य सादर करुन सर्वांची मने जिंकली. यात खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या खेळाडूंचे यश ठळकपणे दिसून आले.

पदक तालिकेतील अव्वल स्थानावरील सर्व्हिसेस आणि तिसऱ्या स्थानावरील हरियाणा यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी १४० पदकांची कमाई करुन ही स्पर्धा गाजवली. खेळाडूंसाठी असलेल्या आधुनिक सुविधा आणि ऑलिम्पिकपटू, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असलेल्या सर्व्हिसेस आणि हरियाणाच्या खेळाडूंच्या कामगिरीच्या तुलनेत महाराष्ट्राच्या हौशी खेळाडूंनी दाखवलेले कौशल्य आणि मिळवलेले यश हे महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रात देशात बलवान असल्याचे दिसून आले.

पदक तालिकेत महाराष्ट्राचा संघ दुसऱ्या स्थानावर दिसत असला तरी महाराष्ट्राने सर्वाधिक १४० पदकांची कमाई करुन आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. जवळपास सर्वच क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदके जिंकली आहेत हे विशेष. स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सराव शिबिरांचे नेटके नियोजन करण्यात आले होते. सर्वच क्रीडा प्रकारांच्या सराव शिबिरात तज्ज्ञ व अनुभवी प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले होते. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सहभागी खेळाडूंसाठी साडेचार कोटी रुपयांची तरतूद केली होती, असे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले. खेळाडूंना प्रवासात त्रास होऊ नये यासाठी विमान प्रवासाची व्यवस्था करण्यात आली होती.

क्रीडा आयुक्त सुहास दिवसे व वरिष्ठ अधिकारी आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांनी नेटके नियोजन केले. स्पर्धेच्या ठिकाणी क्रीडा खात्याच्या अधिकाऱ्यांनी खेळाडूंचे मनोबल वाढवण्याचे काम केले. राज्य शासन, राज्याचा क्रीडा विभाग, खेळाडू, प्रशिक्षक, संघटनांचे पदाधिकारी यांची एकत्रित सांघिक कामगिरी उत्कृष्ट ठरल्यानेच महाराष्ट्राने सर्वाधिक पदकांची कमाई करुन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा डंका वाजवत विजयी पताका दिमाखात फडकवली. ‘टीम महाराष्ट्र आणि जय महाराष्ट्र ही थीम’ ही खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आली असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी