‘स्वारातीम’ विद्यापीठातील प्रो. एस. पी. चव्हाण यांचे लांब पल्याच्या सायकलिंग (बीएमआर) मध्ये यश -NNL


नांदेड|
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील प्राणीशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख व जैवशास्त्र संकुलाचे संचालक प्रो. एस. पी. चव्हाण यांनी आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त लांब पाल्याच्या सायकलींग मध्ये नुकतेच मोठे यश मिळवले. त्यांनी २००कि.मी.(११ ता. २ मि.), ३०० कि.मी.(१९ ता.२९ मि.),४०० कि.मी.(२६ ता.१५ मि.), व ६०० कि.मी.(३९ ता.५७ मि)या लांब पल्ल्याच्या सायकलिंग ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२२या काळात वेगवेगळ्या दिवशी पूर्ण केल्या. 

या इव्हेंट्स ना ब्रॅव्हेट डी रॅडेन्युअर्स मॉन्डीऑक्स (बीआरएम) या नावाने संबोधले जाते. पॅरिस (फ्रान्स) येथील ऑडेक्स क्लब पॅरीसीयन (एसीपी) या आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त संस्थेकडून व ऑडेक्स इंडिया रॅडेन्युअर्स यांच्याकडून प्रो. चव्हाण यांनी पूर्ण केलेल्या सायकल राईडसना मान्यता मिळाली व प्रमाणित करण्यात आले. या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून प्रो. चव्हाण यांना ‘सुपर रॅडेन्युअर (एसआर) अर्थात लांब पल्याचा उत्कृष्ट सायक्लीस्ट’ या उपाधीने सन्मानित करण्यात आले. 

नांदेड सायकलिस्ट यांच्या निरीक्षणाखाली व नियंत्रणात प्रो. चव्हाण यांनी या लांब पल्ल्याच्या सायक्लिंग इव्हेंट पूर्ण केल्या. बीआरएम इव्हेंट या स्पर्धा नसून लांब अंतरांचे सायक्लिंग एका दिलेल्या विशिष्ट वेळेत पूर्ण करण्याच्या स्वयंसिद्धतेची तपासणी करण्याचा आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त प्लॅटफॉर्म आहे असे चव्हाण यांनी सांगितले. यामध्ये सहभागासाठी फिस भरून नोंदणी करावी लागते व दिलेल्या तारखेला व दिलेल्या मार्गावर या इव्हेंट्स पूर्ण केल्यास नियंत्रण करणाऱ्या संस्थांकडून प्रमाणपत्र व मेडल दिले जाते. 

मराठवाडा विभागात औरंगाबाद, नांदेड, परळी व जिंतूर या ठिकाणी लांब पल्याच्या इव्हेंट करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करता येते. भारतातील विविध राजांमध्ये बीआरएम इव्हेंटस घेणारे एकूण ८७ केंद्र आहेत. याबद्दलची तपशीलवार माहिती Audax India Randonneurs या वेबसाईटवर उपलब्ध आहे. भारतातील कोणत्याही केंद्रावर २००, ३००,४००, ६०० कि.मी. सायक्लिंग पूर्ण करण्यासाठी वयाची किमान मर्यादा १८ वर्षे आहे पण कमाल मर्यादा नाही. भारतात १०००कि.मी. व जास्तीत जास्त १२०० कि.मी. च्या बीएमआर इव्हेंटस आयोजित केल्या जातात. 

तसेच प्रदेशात आयोजित १२३० कि.मी.ची बीआरएम इव्हेंट ही दर चार वर्षांनी फ्रान्स देशात होते. पॅरिस शहर ते ब्रेस्ट शहर व परत पॅरीस अशी ही शर्यत (इव्हेंट) असते. मात्र यामध्ये स्वतःशीच शर्यत असते कारण १२०० कि.मी. चे अंतर ९० तासांमध्ये पूर्ण करायचे असते. याचप्रमाणे लंडन ते एडिनबर्ग व परत लंडन ही सुद्धा इव्हेंट १५०० कि.मी.(१२८ ता. २० मी.) चीअसते. भारतात बीएमआर पूर्ण करणाऱ्या सायकलिस्टला पीबीपी व एलईएल या दोन्ही सायकल इव्हेंट्समध्ये भाग घेण्याची संधी असते. या दोन्ही इव्हेंट्स चार वर्षाच्या अंतराने आयोजित केल्या जातात. यामध्ये जिंकणे किंवा हारणे हा विषय नसतो.आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करण्यासाठी जगभरातून सायकलिस्ट यामध्ये भाग घेण्यासाठी आतुर असतात. दिलेल्या वेळेत हे अंतर पूर्ण करणाऱ्या सायकलिस्टला प्रमाणपत्र व मेडल मिळते. यासाठीचा संपूर्ण खर्च हा वैयक्तिक असतो.  

पर्यावरण संरक्षण, आरोग्य रक्षण करण्यासाठी नियमित व जिथे शक्य असेल अशा प्रसंगी सायकल चालवणे हा अत्यंत सोपा, प्रभावी व आर्थिकदृष्ट्या परवडणारा उपाय आहे. वजन वाढणे, मधुमेह, रक्तदाब, सांधेदुखी यापासून बचावासाठी नियमित सायकल चालवणे हा उत्कृष्ट उपाय आहे. मात्र त्यासाठी सातत्य व ध्यास हवा असे मत प्रो. चव्हाण यांनी व्यक्त केले. या लांब पल्याच्या सायकलिंग पूर्ण करण्यासाठी दररोज ४० ते ४५कि.मी. सायकलिंगचा सराव, प्रथीनेयुक्त आहार, शरीरातील पाणी व क्षार यावर नियंत्रण याबद्दलची काळजी घेऊन सराव करणे आवश्यक आहे. असे ते म्हणाले. 

सर्व वयाच्या व्यक्तींनी वयाचे बंधन न ठेवता, जोमाने व नव्या उत्साहाने व्याधीमुक्त जीवन जगण्यासाठी सायकल आवश्यक चालवावी व आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य जोपासावे व त्यात सुधारणा करावी असे आवाहन प्रो. एस. पी. चव्हाण यांनी युवकांना व सर्व वयोगटातील लोकांना केले आहे. या स्तुत्य उपकरणाबद्दल प्रो. चव्हाण यांचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंहबिसेन, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, डॉ. टी.ए. कदम, डॉ.एल.एच. कांबळे आदींनी अभिनंदन केले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी