हिमायतनगर| बुधवारी आणि गुरुवारी सलग दोन दिवस हिमायतनगर शहरसह तालुक्यात विजांचा गडगडाट व वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसाने हजेरी लावली. दरम्यान वीज कडाडून तालुक्यातील मौजे बोरगडी येथील शेतकरी नागोराव राजाराम काईतवाड यांच्या शेतात पडल्याने म्हैस दगावली आहे. तर अतिपावसामुळे या भागातील फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आगामी दिवाळीच्या काळात फुलांची अवाक कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हिमायतनगर शहर व तालुका परिसरात विजयादशमी पासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. थांबून थांबून ढगफुटी सदृश्य पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांची उर्वरित पिकेही धोक्यात आली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कापूस वेचणीला असताना सुरु असलेल्या पावसामुळे पांढऱ्या सोन्याचेही मोठे नुकसान होते आहे. अगोदर सोयाबीन हातचे गेले, उर्वरित कापसावर शेतकऱ्यांची भिस्त होती. आता त्यावरही परतीच्या पावसाचे संकट ओढावल्याने शेतकरी हतबल झाला आहे. या शेतकऱ्यांना आता शासनाने वाढीव नुकसान भरपाईची मदत द्यावी अशी मागणी जोर धरते आहे.
दिनांक १३ ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकडासह ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यात बोरगडी येथील शेतकरी नागोराव राजाराम काईतवाड यांची चारण्यासाठी सोडलेल्या म्हशीवर वीज कोसळलेली यात म्हैस दगावली असल्याने त्यांचे ७० हजारांचे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे अतिवृष्टी तुन शिल्लक राहीलेले काढणीला आलेले सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच कापूस, झेंडु, तुर, यासह नगदी पिकांचे नुकसान झाले. शासनाने शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर पडण्यासाठी तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.