काकडा दिंडीने सकाळच्या प्रहरी हिमायतनगरात घुमू लागले हरीनामाचे स्वर -NNL

शेकडो वर्षाची परंपरा कायम ठेवत हिमायतनगरात काकडा दिंडीला झाला प्रारंभ


हिमायतनगर, अनिल मादसवार|
अश्विन शुद्ध पौर्णिमेच्या समाप्तीनंतर कार्तिक मासाच्या पहिल्या दिवशीच्या सुरुवातीला अभ्यंगस्नानाने हिमायतनगर शहरातील महिला - पुरुष वारकरी सांप्रदाईक भजनी मंडळाने काकडा दिंडीला प्रारंभ केला आहे. यामुळे शहरात सकाळच्या रामप्रहरी हरी नामाचे स्वर निनादू लागल्याने दिवाळीच्या पर्वकाळात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.


शेकडो वर्षाच्या परंपरेने चालत आलेल्या रिती - रिवाजाप्रमाणे सकाळच्या प्रहरी टाळ - मृदंगाच्या वाणीत काकडा दिंडी काढून सर्व देवी देवतांचे दर्शन घेणार्यास मोक्ष मिळतो. असा ग्रामीण भागातील नागरिकांचा समाज आहे. तीच परंपरा जोपासत शहरातील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर, महाकाली, कालीन्का महिला व पुरुष भजनी मंडळाच्या वतीने काकडा दिंडी काढण्यात येते. सदर दिंडी हि टाळ - मृदंग, आरती व भजन मंडळीच्या सानिध्यात काढली जाते. या दिंडीत नागरिकांसह अबाल वृद्ध व बालके सुद्धा हाती भगवा झेंडा घेऊन सहभागी होतात. तर गृहिणी सकाळच्या प्रहरी सडा सारवण करून घरासमोर रांगोळी काढून दिंडीचे स्वागत करतात.


वारकरी संप्रदायाच्या महिला मंडळी श्री परमेश्वर, कालीन्का मंदिरात जाऊन काकडा आरतीत सहभागी होतात. यात विविध प्रकारची आरती गाऊन ग्रामस्थांना जागृत करीत आहेत. भक्तिगीतांच्या काकडा आरतीने व शहरातील मुख्य रस्त्यावरून घुमणार्या दिंडीने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. हा काकडा दिंडीचा कार्यक्रम जवळपास महिनाभर चालणार असून, गुलाबी थंडीत सकाळी स्नान करून दिंडीत सहभागी होणार्या वारकरी, भक्त व बालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सदर दिंडीचा समारोप कार्तिक पोर्णिमा समाप्तीच्या दिवशी शहरातील मुख्य रस्त्यावरून पालखी मिरवणूक काढून भव्य महाप्रसादाने केली जाणार आहे.

सकाळच्या रामप्रहरी उठून फिरणे हे शरीरासाठी व आरोग्यासाठी लाभदायक आहे. म्हणूनच जुन्या लोकांनी दिंडीच्या प्रथेतून हि संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे जुन्या जाणकारातून सांगितले जाते. या दिंडीत शहरातील वारकरी संप्रदायाचे अनेक भजनी मंडळाचे कार्यकर्ते, महिला, बालक, युवक सामील होत असल्याने सर्वातर भक्तीमय वातावरण निर्माण झाले असल्याचे पाहवयास मिळते आहे.    


हिमायतनगर शहरात शेकडो वर्षाच्या परंपरेने चालत आलेल्या रिती - रिवाजाप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या महिला - पुरुष भाविक भक्तांनी सकाळच्या प्रहरी टाळ - मृदंगाच्या वाणीत काकडा दिंडी काढून सर्व देवी देवतांचे दर्शन घेतात. हि दिंडी कार्तिक पौर्णिमेपर्यंत सकाळच्या प्रहरी दररोज शहरातील मुख्य रत्स्याने देवी देवतांचे दर्शन घेऊन येते आहे. छाया -उत्कर्ष मादसवार 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी