आज वसंत बहारने दिवाळी पहाटचा शानदार समारोप
नांदेड| जिल्हा प्रशासन, गुरुद्वारा बोर्ड, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी पहाटचा दुसरा दिवस पं. हेमंत पेंडसे (पुणे) यांच्या सूर दीपावली कार्यक्रमाने गाजला. आजचा कार्यक्रम स्वयंवर प्रतिष्ठानने आयोजित केला होता.
कार्यक्रमाची सुरुवात आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे समन्वयक निळकंठ पाचंगे आणि नागरी सांस्कृतिक समितीचे लक्ष्मण संगेवार, अॅड. गजानन पिंपरखेडे, प्रा. सुनिल नेरलकर, शंतनू डोईफोडे, सुरेश जोंधळे, आनंदी विकास, विजय जोशी, चारुदत्त चौधरी, बापू दासरी, रत्नाकर अपस्तंभ, विजय होकर्णे, वसंत मैय्या, उमाकांत जोशी, हर्षद शहा, विजय बंडेवार, दीपक मुळे यांनी दीपप्रज्वलन केले आणि सर्व कलाकार आणि मान्यवरांचा सत्कार केला.
या कार्यक्रमास नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी दिवाळी पहाट हा कार्यक्रम शासनातर्फे आयोजित करण्याची मागणी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे करणार असल्याची घोषणा केली.
सुरुवातीस स्वयंवर प्रतिष्ठान, नांदेडचे अध्यक्ष प्रा. सुनिल नेरलकर यांनी प्रास्ताविक केले. पं. जितेंद्र अभिषेकी यांचे पट्टशिष्य पं. हेमंत पेंडसे (पुणे) यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग मनोरंजनीने केली. त्यांनी गायलेल्या विलंबित एकतालातील बंदिश नाम तिहारो त्यानंतर झपतालातील बंदिश आणि नंतर गायलेला सुरेख तराना यांच्या प्रस्तुतीने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. यानंतर अभिषेकी बुवांच्या संगीताने अजरामर झालेली घेई छंद मकरंद व हे सुरांनो चंद्र व्हा ही नाट्यगीते गाऊन नांदेडकर रसिकांची मने जिंकली.
त्यानंतर गायलेल्या आम्ही विठ्ठलाचे वारकरी, अबीर गुलाल, हरी भजनावीण काळ, अवघे गर्जे पंढरपूर, हिंदी भजन एक सूर चराचर छायो या अभंग- भक्तीगीतांनी अवघे वातावरण भक्तिमय करून टाकले. सुप्रसिद्ध भैरवी कैवल्याच्या चांदण्याला गाऊन कार्यक्रमाचा समारोप केला. त्यांना संवादीनीवर प्रा.डॉ. दिलीप दोडके, तबल्यावर सुप्रसिद्ध युवा तबलावादक प्रशांत गाजरे, पखवाजवर विश्वेश्वर जोशी, टाळावर सचिन शेटे यांनी उत्कृष्ट साथसंगत करून कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. कार्यक्रमाचे अतिशय सुरेख निवेदन ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत उमरीकर यांनी केले. या कार्यक्रमास नांदेडकर रसिकांनी गर्दी करून उदंड प्रतिसाद दिला.
उद्या दि.२६ ऑक्टोबर रोजी अॅड.गजानन पिंपरखेडे यांच्य संकल्पनेतून व पत्रकार विजय जोशी यांची निर्मिती असलेल्या वसंत देसाई, वसंत प्रभू व वसंत पवार यांच्या अजरामर गितावर आधारीत वसंत बहार हा कार्यक्रम सकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शन प्रख्यात संगीतकार आनंदी विकास व प्रमोद देशपांडे यांचे आहे. तर संगीत संयोजन लक्ष्मीकांत रवंदे व राजू जगधने यांचे आहे.
या कार्यक्रमास आसावरी रवंदे, पौर्णिमा कांबळे, डॉ. कल्याणी जोशी, भाग्यश्री टोमपे पाटील, अपूर्वा कुलकर्णी, ब्रम्हा कुलकर्णी, लक्ष्मीकांत रवंदे, धनंजय कंधारकर, ओंकार क्षीरसागर व विजय जोशी हे गायक आपली कला सादर करणार आहेत. कार्यक्रमाला साथसंगत पंकज शिरभाते, राजू जगधने, गौतम डावरे, जगदीश व्यवहारे, सुभाष जोगदंड, अमित निर्धल, चिन्मय मठपती, सुनील लांबटिळे हे करणार आहेत. दिवाळी पहाटचा समारोप या सुंदर कार्यक्रमाने होणार असून, सकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम उद्या दि.२६ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे संयोजन समितीने कळविले आहे.