नांदेड| नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने, दैनिक प्रजावाणाीचे माजी संपादक तथा स्वातंत्र्यसैनिक सुधाकरराव डोईफोडे यांच्या स्मरणार्थ व्याख्यानाचा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. त्याचे पहिले पुष्प प्रख्यात पत्रकार सुरेश भटेवरा हे गुंफणार आहेत.
मनपाच्या या प्रबोधनमालेचे उद्घाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री, आमदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते येत्या शनिवारी (दि.15) केले जाणार आहे. महापौर सौ. जयश्री नीलेश पावडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह मान्यवर लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे.
यावेळी सुरेश भटेवरा हे ‘राजधानी दिल्ली कालची आणि आजची’ या विषयावर बोलणार आहेत. सन 2017 सालच्या मनपा निवडणुकीत काँग्रेसने सादर केलेल्या ‘विचारातून विकासाकडे’ या जाहीरनाम्यात शहरातील मूलभूत सोयीसुविधांचे सक्षमीकरण करण्यासोबतच काही विशेष संकल्प जाहीर करण्यात आले होते. त्यांतील व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या स्मरणार्थ ‘कॉमनमॅन’चे शिल्प, मसाप आणि नाट्य परिषदेच्या नांदेड शाखांना कार्यक्रम-उपक्रमांकरिता स्वतंत्र जागा, मनपा जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण इ. बाबींची गेल्या 4 वर्षात पूर्तता झाली.
याच विशेष संकल्पात (कै.) सुधाकरराव डोईफोडे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी एका व्याख्यानाचे आयोजन करण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार वरील कार्यक्रम निश्चित झाला असून पुढील काळात तो दरवर्षी घेण्यात येणार आहे. वरील कार्यक्रमास शहरातील साहित्यिक, पत्रकार तसेच डोईफोडे यांच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे व गिरीश कदम आणि उपायुक्त भरत राठोड व नीलेश सुंकेवार यांनी केले आहे.
(कै.) सुधाकरराव डोईफोडे स्मृती व्याख्यानाचा कार्यक्रम डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनाच्या सभागृहात (जिल्हाधिकारी कार्यालय परिसर) शनिवारी सायंकाळी 5.00 वाजता सुरू होणार आहे. हे पुष्प गुंफणारे व्याख्याते सुरेश भटेवरा, नाशिक हे ज्येष्ठ पत्रकार तसेच राजकीय विश्लेषक म्हणून सुपरिचित आहेत. महाराष्ट्र टाइम्स दैनिकात त्यांनी प्रदीर्घ काळ पत्रकारिता केली. त्यातील तब्बल 14 वर्षे ते या वृत्तपत्राचे दिल्लीतील विशेष प्रतिनिधी होते. तत्पूर्वी तरुण वयात ते वेगवेगळ्या चळवळी व राजकारणातही कृतिशील होते. अलीकडेच त्यांचा ‘शोध... नेहरू-गांधी पर्वाचा!’ हा महत्त्वाचा ग्रंथ प्रकाशित झाला. त्याशिवाय त्यांच्या नावावर इतर पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत.