धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्यातर्फे रस्त्यावरील ३६ भ्रमिष्ट व्यक्तींची कटिंग दाढी
नांदेड| दिवाळीनिमित्त घेण्यात आलेल्या कायापालट या उपक्रमाच्या २१ व्या महिन्यात संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्यातर्फे रस्त्यावरील ३६ भ्रमिष्ट व्यक्तींची कटिंग दाढी केल्यानंतर उपटन लावून अभंग स्नान घातले.नवीन कपडे व शंभर रुपये बक्षिसी तसेच दिवाळीचा फराळ दिल्यानंतर भाऊबीज निमित्त त्यांचे औक्षण केल्यानंतर त्यांच्या हस्ते फटाक्याची आतिषबाजी करून उपेक्षितांची आगळीवेगळी दिवाळी साजरी केल्यामुळे मोबाईलच्या युगात अजूनही माणुसकी शिल्लक असल्याचा प्रत्यय आला.
नांदेड शहरातील विविध भागातून वेडसर, निराधार,बेघर,अपंग, कचरा वेचणारे यांना अरुणकुमार काबरा,सुरेश शर्मा, मंगेश पोफळे,कामाजी सरोदे,संजयकुमार गायकवाड, तिरुपती भगनुरे यांनी बालाजी मंदिर परिसरात आणले. डोक्यावरील केस व दाढी वाढलेल्या या सर्वांची स्वंयसेवक बजरंग वाघमारे यांनी कटिंग दाढी केली. त्यानंतर सुगंधी उपटन लावून सर्वांची मोती साबणाने येथेच्छ आंघोळ घालण्यात आली. स्वच्छ व मुबलक पाण्याची व्यवस्था बालाजी मंदिरचे महंत कैलास महाराज वैष्णव यांच्यातर्फे करण्यात आली होती.
त्या सर्वांना नवीन कपडे व शंभर रुपये बक्षीसी देण्यात आली. यानंतर सविता काबरा, अनुराधा गिराम, कौशल्या शर्मा, ज्योति रापतवार, मीरा तिवारी, कलावती शर्मा यांच्यासह इतर महिलांनी सर्व निराधारांची भाऊबीजेची ओवाळणी केली. निराधारांच्या हस्ते फटाके वाजविण्यात आले. सर्वांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला. हा आगळावेगळा कौतुक सोहळा पाहून अनेकजण गहिवरून गेले.चार तास सुरु असलेल्या कार्यक्रमानंतर बालाजी मंदिरचा परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला.
गीता परिवाराचे संस्थापक अध्यक्ष ॲड. चिरंजीलाल दागडिया,ॲड.बी.एच.निरणे, शिवनरेश चौधरी, महेंद्र शिंदे यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. भाजपा सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष परळीकर, श्रीमती सुमनबाई सगर, इंद्रजीत खियाणी, सुकन्या ओझा ,कविता शर्मा, मीनाक्षी वाडे छाया शर्मा कौशल्या पांडे, मीना शर्मा यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी राधे राधे सत्संग ग्रुप तर्फे अशोक राठी सुजित राठोड चतुर्भुज मंत्री व इतर सदस्यांनी दिलीप ठाकूर यांचा सत्कार करून अभिनंदन केले.यापुढे असहाय्य दिसणारे, कचरा वेचणारे, वेडे ,भिकारी, अपंग व्यक्ती आढळल्यास नांदेड शहरातील नागरिकांनी याची डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी भाजप अथवा लायन्स सदस्यास माहिती द्यावी असे आवाहन संयोजक ॲड दिलीप ठाकूर यांनी केले. समाजातील उपेक्षित घटकातील सदस्यांची दिवाळी गोड केल्याबद्दल दिलीप ठाकूर व त्यांच्या सर्व टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.