दीड महिन्यात १ कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा मोफत एसटी प्रवास -NNL


मुंबई|
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाच्या निर्णयामुळे अवघ्या ५२ दिवसांमध्ये १ कोटी ४ लाख ८६ हजार ज्येष्ठांनी याचा लाभ घेतला आहे. 'अमृत ज्येष्ठ नागरिक' योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाल्याने १ कोटी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद राज्य शासनाला मिळाल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवासाच्या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर अधिवेशन कालावधीत २५ ऑगस्ट, २०२२ रोजी ज्येष्ठांना  मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्राचे वितरण करून योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

राज्यात २६ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर २०२२ या महिन्याभराच्या कालावधीत राज्यभरातून ५४ लाख ५८ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला होता. आता १६ ऑक्टोबरपर्यंत योजनेंतर्गत मोफत प्रवास केलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या १ कोटी ४ लाख ८६ हजार ८०९ एवढी झाली आहे. ज्येष्ठांना मोफत प्रवास योजनेमुळे जिल्ह्याच्या तसेच मोठ्या शहरांमध्ये वैद्यकीय उपचारासाठी जाणे शक्य होत आहे.

योजनेद्वारे राज्यभरातून दिवसाला सरासरी २ लाख ज्येष्ठ नागरिक एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे. प्रवासादरम्यान आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी