नेजाबाजी कवायती उत्साहात; रविवारी भव्य नगरकीर्तन यात्रा
नांदेड। येथून जवळच असलेल्या गुरुद्वारा माता साहेब देवाजी येथे सुरु असलेल्या 341 व्या माता साहिब देवाजी जन्मोत्सव कार्यक्रमात भक्तांचा जनसागर उसळला. कीर्तन दरबार आणि नेजाबाजी कवायती पाहण्यासाठी भव्य अशी गर्दी झाली होती.
शनिवार दि. 8 ऑक्टोबर रोजी माता साहिब देवाजी जन्मोत्सवाचा दूसरा दिवस होता. शनिवारी सकाळी 10 वाजता कीर्तन दरबार धार्मिक दिवान कार्यक्रमास सुरुवात झाली. श्री गुरुग्रंथ साहेब यांच्या सन्निध्यात गुरुबाणी पठन, कथा आणि कीर्तन सारखे कार्यक्रम पार पडले. मंचावर संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले, जत्थेदार संतबाबा तेजासिंघजी मातासाहेब वाले आणि विविध दल पंथाचे पदाधिकारी व धार्मिक क्षेत्रातील प्रतिनिधींची उपस्थिती होती.
यावेळी भाई देविंदरसिंघजी निरमाण श्री दरबार साहिब अमृतसर, भाई जीवनसिंघजी रागी जत्था लुधियानावाले, भाई जरनैलसिंघजी हजूरी रागी जत्था, कवीश्वर भाई सुखबीरसिंघ गुरु नानक दल मडियावाले, ज्ञानी हरिंदरसिंघजी अलवरवाले, गुरुद्वारा माता साहेब येथील स्थानीक रागी जत्थे यांनी आपले कार्यक्रम सादर केले. सायंकाळी निहंग सिंघांच्या विविध दलांच्या वतीने नेजाबाजी घोड्यांच्या कवायती सादर करण्यात आल्या. नेजाबाजीचे थरार पाहण्यासाठी हजारोच्या संख्येत भाविक उपस्थित होते.
रविवारी जन्मोत्सव कार्यक्रमाचे सुप वाजणार आहे. सकाळी कीर्तन दरबार आणि समापन कार्यक्रम होईल. तदनंतर दुपारी 2.30 वाजता सुमारास माता साहेब येथून भव्य अशी नगर कीर्तन यात्रा काढण्यात येणार आहे. नगर कीर्तन यात्रा माता साहेब ते नांदेड येथील तखत सचखंड हजुरसाहिब येथे दाखल झाल्यानंतर यात्रेचे विसर्जन होईल. अशी माहिती संतबाबा तेजासिंघजी यांनी दिली.