नांदेड। 5 सप्टेंबर हा शिक्षकदिन नांदेड जिल्हा परिषद अभिनव पद्धतीने साजरा करणार असून 'आम्ही चालवू आमची शाळा' या उपक्रमांतर्गत विद्यार्थी शिक्षकांप्रती कृतज्ञता दर्शविणारा असून विद्यार्थीच स्वयंस्फूर्तीने शाळा चालवतील असे निर्देश नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी आज दिले.
शालेय गुणवत्ता विकास, शिक्षण विभागातील प्रलंबित कामे, आदर्श शाळा, विभागीय आयुक्त यांच्या फ्लॅगशिप कार्यक्रमातील मुद्दे या अनुषंगाने आज सर्व शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दीर्घकाळ चाललेल्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सांगितले. आयुक्तांच्या फ्लॅगशिप उपक्रमांतर्गत शास्त्रज्ञांची जयंती, परमवीर चक्र विजेत्यांची जयंती, ऑलिंपिक स्पर्धेत विजेत्यांची जयंती, खगोलशास्त्र क्लब, वाईल्ड लाईफ क्लब, विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर, शाळा ग्रंथालय, नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र आदी संदर्भाने विस्तृत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांना व्यवस्थापन करता यावे यासाठी 5 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांमधूनच मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांमधूनच शिक्षक शाळा चालवणार असून आपल्या शिक्षकांप्रती या उपक्रमाच्या माध्यमातून कृतज्ञता दर्शवणार आहेत. या बैठकिला प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्हयातील गटशिक्षणाधिकारी व सर्व शिक्षा अभियानातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.