हिंदूंचे सरकार म्हणवणाऱ्यांच्या राज्यातच हिंदू शेतकरी वाऱ्यावर - नाना पटोले -NNL

कृषीमंत्र्यांचा शेती व शेतकऱ्यांशी काहीही संबंध नाही; केवळ इव्हेंजबाजी सुरु


मुंबई|
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना राज्य सरकारकडून केवळ मदतीची घोषणा केली आहे, ही मदत अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. राज्यातील भाजपाप्रणित ईडी सरकार हे हिंदू हिताचा केवळ दिखावा करत आहे. प्रत्यक्षात हे सरकार शेतकरी विरोधी आहे. हिंदूंचे सरकार आले असून सण, उत्सव आनंदात साजरा करा असा डांगोरा पिटणाऱ्यांच्या राज्यातच हिंदू शेतकरी मात्र मदतीपासून वंचित आहे हा मोठा विरोधाभास आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. 

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यातील सध्याचे सरकार हे केवळ इव्हेंटबाज आहे, या सरकारला शेतकऱ्यांशी काहीही देणेघेणे नाही. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही, आजही पंचनामेच सुरु आहेत. शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखवण्यासाठी भाजपाच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी यवतमाळच्या एका गावातील शेतकऱ्याच्या घरी मुक्काम केला पण नंतर त्याच शेतकऱ्याने आत्महत्या केली. आजही कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती दाखवण्यासाठी एक कार्यक्रम जाहीर केला पण तो केवळ इव्हेंट आहे. अशा इव्हेंटमधून शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार नाहीत. कृषी मंत्री हा शेती व शेतकऱ्यांची जाण असणारा असायला हवा पण सध्याच्या कृषीमंत्र्यांबाबत तसे नाही. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा शेतकऱ्यांशी काहीही संबंध नाही, त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख काय कळणार ? एखादा इव्हेंट करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील असा त्यांचा दावा असेल तर तो साफ चुकीचा आहे.

भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षांची सरकारे पाडण्यासाठी काळ्या पैशाचा वापर करत आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ३५०० कोटी रुपये खर्च केल्याची चर्चा आहे. बंडखोरी केलेल्या काही आमदारांनी ५० कोटींची ऑफर असल्याचे सांगितले होते. हा काळा पैसा भाजपाकडे कुठून येतो याची सीबीआय, ईडीने चौकशी केली पाहिजे. तसेच राज्यातील जे आमदार गुवाहाटीला गेले होते त्यांच्याबद्दल लोकामध्ये आजही संभ्रम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २०० आमदार निवडून आणण्याचा दावा करत आहेत पण फुटीर आमदारांच्या मतदार संघातच जनतेचा त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे असेही पटोले म्हणाले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी