स्थानिक प्रसारण पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन
नांदेड। नांदेड आकाशवाणीसह महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांचे पूर्वीप्रमाणे तिन्ही वेळेत स्थानिक प्रसारण सुरू करण्यात यावे, या मागणीचे निवेदन आज खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना आकाशवाणी प्रासंगिक उद्घोषक व संकलक संघटनेने दिले आहे.
दिनांक 1 जुलै 2022 पासून महाराष्ट्रासह गोवा आणि मध्यप्रदेशच्या एलआरएस केंद्रावरून आकाशवाणीचे दुपारचे व संध्याकाळचे असे दोन वेळचे प्रसारण बंद केले गेले आहे. स्थानिक कार्यक्रम बंद करून या वेळेत मुंबई व ईतर आकाशवाणीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जात आहेत. त्यामुळे स्थानिक कलावंत, कवी वक्ते, कथाकार व नाटककार सादरीकरणाला मुकले आहेत तसेच प्रासंगिक उद्घोषक व संकलन यांच्या ड्यूट्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या 25 ते 30 वर्षापासून असलेले निवेदक बेरोजगार झाले आहेत. प्रसारण बंद झाल्यामुळे श्रोते व कलावंत नाराज झाले आहेत. स्थानिक प्रसारण पुन्हा सुरू करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा शेख हसीना, सचिव अंकुश सोनसळे, आनंदा गोडबोले, नम्रता वावळे, बालाजी गवारे व सल्लागार मिलिंद व्यवहारे यांची उपस्थिती होती.
स्थानिक आकाशवाणी केंद्राचे प्रसारण पुन्हा सुरू करण्यासाठी दिल्ली आकाशवाणी केंद्राशी पत्र व्यवहार करून पुन्हा हे प्रसारण सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी सांगितले. त्यांनी या निवेदनाची दखल घेऊन या संदर्भात दिल्ली कार्यालयास मेल देखील पाठवून पुन्हा स्थानिक प्रसारण सुरू होण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. नांदेडचा रेडियो बंद पडू देणार नाही, असे आश्वासन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.