वाडेबोल्हाई ( जि. पुणे) येथील ' कुलदेवता श्री बोल्हाई माता '' -NNL


कंधार, माणिक भिसे।
नवरात्रोत्सवात आदिशक्तीच्या विविध रुपांची महती वर्णिली जात असते. राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या देवींच्या मंदिरात पारंपारिक नवरात्र महोत्सव साजरा केला जातो. 

असेच आदिशक्ती चे जागृत देवस्थान म्हणून आमच्या कुलदेवता असलेल्या पुणे जिल्ह्यातील वाडेबोल्हाई मातेला ओळखले जाते. ऐतिहासिक तिर्थक्षेत्र असलेल्या पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई मंदिरात दर रविवारी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. 

 सन १९३१ साली शके १८०७ मधील ज्येष्ठ शुद्ध पंचमी ला बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी मंदिराच्या परकोट पूर्व पश्चिम १८७.५ फूट तर दक्षिणोत्तर १७० फूट बांधकाम केले. मंदिराच्या प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. मातेची नियमित पुजा पहाटे पाच वाजता नगारा वाजवून होते. देवीची त्रिकाल पूजा असते. 

मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात मुख्य देवीच्या बाजूला भवरागीरी आई व काशीआई अशा काळ्या पाषाणाच्या मूर्ती आहेत. मध्यभागी श्री बोल्हाई देवीची मूर्ती आहे. देवीला पुरणपोळी चा नैवेद्य लागतो. 

भारतातील अतिशय दुर्मिळ असलेली परंपरा या मंदिरात पहावयास मिळते ती म्हणजे  श्री बोल्हाई देवीचा ओलांडा. दर रविवारी दुपारी १२ ची आरती झाल्या नंतर भक्तांना आशिर्वाद देण्यासाठी पुजारी  देवीच्या पंचारती चे ताट घेऊन   देवीच्या माहेरघरी निघतो त्यावेळी त्याच्या पायाशी भक्तगण दर्शनासाठी वाकतात  त्यावेळी प्रत्यक्षात देवी आपल्या अंगावरून ओलांडून जात आहे. तिचा स्पर्श आपल्याला होत आहे अशी येथे येणारे भक्तगण श्रद्धेने अनुभव सांगतात. 

आदिशक्ती माता पार्वतीचे रुप असलेल्या श्री बोल्हाई देवीची महायात्रा ही दरवर्षी आश्विन महिन्यात येणाऱ्या दर रविवारी भरते. पहिला रविवार हळद कुंकवाचा, दुसरा, पान फुलांचा, तिसरा, तेल धुनीचा, तर चौथा रविवार हा सर्वात मोठी महायात्रा असते. त्या दिवशी सायंकाळी देवीची पालखीतून मिरवणूक काढली जाते. रात्रभर जागरण, गोंधळ चालू असतो. 

देवीच्या मंदिराजवळच मोतीबा व मोती सागर तळे आहे. याला गुणकारी  तळे म्हणून ओळखले जाते. या तळ्यात बारमाही पाणी असते. येथील पाणी अंगावरील खरूज, नायटे, त्वचारोग दूर करते अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्री बोल्हाई माता भक्तांच्या आकांक्षा, मनोकामना, पूर्ण करते. भक्तांच्या नवसाला पावणारी श्री बोल्हाई माता अनेकांची कुलदेवता आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. आदिमाया, आदिशक्तीचे जाज्वल्य रुप असलेल्या बोल्हाई देवीची ख्याती सर्वदूर आहे. 

-------------------------

___ सौ. नलिनी लोखंडे, अध्यक्ष, बोल्हाई प्रतिष्ठान, उस्माननगर ता. कंधार

मंदिरात त्रिकाल पुजेत म्हणली जात असलेली पारंपारिक " आरती  "

श्री बोल्हाई देवीची आरती------

निर्गुण गुणवंते जय जय सुखकर्ते

 सर्वांगण माये तू साधू समर्थ 

जय जय अंबे तू अनाथ नाथे भक्तासी तारीके  भवरागिरी माते 

जयदेवी जयदेवी जय  भवरागिरी आई भवरागिरी निर्गुण निराकारी भवसागर तारी जयदेव जयदेव!१! 

बोल्हाईचे नाम म्हणताही वाचे मन हे मनोरथ पुरवि भक्ताचे नामेचीसार्थक बहुता जन्माचे, दुःख हरे मग दारिद्र्य कैसे 

जयदेवी जयदेवी जय भवरागिरी  आई भवरागिरी निर्गुण निराकारी 

भवसागर तारी जयदेव जयदेव! २! 

पंचारती घेऊन आले हो जन

 जे जे भक्तालाहि  जे जे दासालाही   काशीचरण 

काशीचे अंबे होते पावन होते पावन 

ते तू भक्तालाहि ते तू दासालाही काशीचरण 

जयदेवी जयदेवी जय भवरागिरी आई भवरागिरी निर्गुण निराकारी भवसागर तारी जय देव जय देव! ३! 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी