नांदेड| आंबेडकरी समाजाचे राजकीय भवितव्य चिंताग्रस्त झाले असून गटा-तटात आणि विविध राजकीय पक्षात विखुरलेल्या आंबेडकरी कार्यकर्ते तसेच नेत्यांवर चिंतनाची वेळ आली आहे. आपल्या फुटीरतेचा फायदा संविधानविरोधी राजकीय पक्ष घेत आहेत. त्यामुळे तरुणांना राजकीय भूमिका नसणे ही भयावह बाब आहे. आजच्या काळात एक सशक्त राजकीय भूमिका घेणे आवश्यक आहे.
आंबेडकरी समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आंबेडकरी आणि समविचारी नेत्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत येथील ऑल इंडिया भिखू संघाचे जिल्हाध्यक्ष धम्मगुरू, संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी व्यक्त केले. ते शहरात भरलेल्या पाचव्या फुले आंबेडकरी विचारधारा साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी मंचावर संमेलनाध्यक्ष अनिल मोरे, खुरगाव नांदुसा येथील श्रामणेर भिक्खू संघ, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य विलास सिंदगीकर, प्रमुख अतिथी साहित्यिक डॉ. राम वाघमारे, स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. सा. द. सोनसळे', विवेक काटीकर, यशवंत मनोहर प्रतिष्ठान नागपूरचे अध्यक्ष प्रशांत वंजारे, निमंत्रक तुकाराम टोंपे, काव्य पौर्णिमा अध्यक्ष दिगंबर कानोले, मुख्य संयोजक अशोक मल्हारे, सहसंयोजक प्रभू ढवळे, संयोजन समितीचे अध्यक्ष मारोती कदम, उपाध्यक्ष डॉ. गजानन देवकर, कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे यांची उपस्थिती होती.
राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित पाचव्या फुले आंबेडकरी विचारधारा साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. शहरातील आयटीआय चौकस्थित म. फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान रॅलीस प्रारंभ झाला. यात माजी उपप्राचार्य साहेबराव इंगोले प्रा एस.एच. हिंगोले, प्रा. विनायक लोणे यांच्या संयोजनाखाली श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथील भिक्खू संघाने सहभाग नोंदवला होता. रॅलीचे विसर्जन प्रतापसिंह बोदडे साहित्य नगरी कुसुम सभागृह येथे करण्यात आले. त्यानंतर कवी दिगंबर कानोले यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटनपूर्व ६१ वी काव्य पौर्णिमा संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला म. फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्पपूजन आणि दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर 'संघनायक' आणि 'दैनिक प्रबुद्ध परिवार' या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. सुप्रसिद्ध कवी विवेक काटीकर यांना दहा हजार रुपयांचा धनादेश, मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन कवीसूर्य यशवंत मनोहर काव्य पुरस्काराने गौरविण्यात आले. सन २०२१ आणि सन २०२२ या वर्षांचे फुले आंबेडकरी विचारधारा राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले. तसेच मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठानच्या पुरस्कारांचेही वितरण झाले. दरम्यान, तुकाराम टोंपे, प्रा. डॉ. सा. द. सोनसळे, विलास सिंदगीकर, डॉ. राम वाघमारे यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक मारोती कदम यांनी केले, सूत्रसंचालन प्रज्ञाधर ढवळे यांनी केले तर आभार आनंद गोडबोले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनुरत्न वाघमारे, नागोराव डोंगरे, रणजीत गोणारकर, साईनाथ रहाटकर, कैलास धुतराज, शंकर गच्चे, प्रकाश ढवळे, भैय्यासाहेब गोडबोले यांच्यासह संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
मी कॉंग्रेसचा प्रचार केला नाही.....
एका लग्नप्रसंगी ओघात बोलून गेलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. मी कधीही कॉंग्रेस किंवा तत्सम राजकीय पक्षाचा प्रचार केला नाही. केंद्रात किंवा राज्यात संविधान विरोधी तसेच मनुवाद प्रणीत सरकारला अथवा त्या राजकीय पक्षांना मदत होऊ नये. हा त्यामागचा हेतू होता. त्यांचा उमेदवार निवडून येणार नाही, याची काळजी घ्यावी या संदर्भाने बोललो. निवडणुकीत समाजाने ठाम विचार करणे गरजेचे असते. फुले आंबेडकरी विचारधारेचे उमेदवार निवडून आले तर संविधानास बाधा पोहोचणार नाही. धम्म चळवळीच्या उत्थानासाठी राजाश्रय आवश्यक असतो. याचे संदर्भ इतिहासातही आहेत. त्यामुळे फुले आंबेडकरी विचारधारेचे उमेदवार निवडून दिले पाहिजेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले.