केंद्र सरकारने शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांच्या देहत्यागाबद्दल राष्ट्रीय दुखवटा जाहीर करावा - हिंदु जनजागृती समिती -NNL


मुंबई|
नुकतीच ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांचे निधन झाले, म्हणून भारत सरकारने राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. तसे पाहिले, तर त्यांचे भारताच्या निर्माणात कोणतेही योगदान नाही. उलट ब्रिटिशांनी आपल्या भारत देशावर 150 वर्षे राज्य करून भारतियांवर अनन्वित अत्याचारच केले. त्या देशाच्या महाराणीच्या निधनाविषयी भारत सरकार राष्ट्रीय दुखवटा जाहीर होतो. मात्र देशासाठी स्वत:चे जीवन समर्पित करणारे भारताचे सुपुत्र तथा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेणारे हिंदु धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांच्या देहत्यागानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर होत नाही, हे दुर्दैवी आहे. भारत सरकारने हिंदूंच्या सर्वोच्च धर्मगुरूंच्या देहत्यागाबद्दल 'राष्ट्रीय दुखवटा’ जाहीर करून त्यांचा यथोचित सन्मान करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. अमित शहा यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. या मागणीत समितीने म्हटले आहे की, शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांचे दिनांक 11 सप्टेंबर 2022 या दिवशी मध्य प्रदेशमधील नरसिंहपूर जिल्ह्यात श्रीझोटेश्वर धाम येथे वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले आहे. शंकराचार्य हे हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरु होते. भगवान आदि शंकराचार्य यांनी भारतात स्थापन केलेल्या चार पिठांपैकी द्वारका येथील शारदापीठ आणि बद्रीनाथ येथील ज्योतिष्पीठ या दोन पिठांचे ते शंकराचार्य होते. वयाच्या 9 व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि धर्मकार्य हाती घेतले. त्यांनी वेद-वेदांग आणि शास्त्रांचे शिक्षण काशी (उत्तर प्रदेश) येथे घेतले. 

धर्मसम्राट करपात्री महाराजांचे शिष्योत्तम बनून त्यांनी देव, धर्म आणि देश रक्षणासाठी स्वत:चे जीवन समर्पित केले होते. वयाच्या 19 व्या वर्षी स्वातंत्र्यलढ्यात देखील भाग घेतला होता. म. गांधींच्या 1942 च्या इंग्रजांविरूद्धच्या ‘भारत छोडो’ आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी 15 महिने तुरुंगवासही भोगला. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे नऊ महिने आणि मध्य प्रदेशात सहा महिने तुरुंगात काढले होते. त्यामुळे ते ‘क्रांतीकारी साधू’ म्हणून परिचित झाले. शिवाय श्रीराममंदिर लढ्यात देखील शंकराचार्यांनी मोठे  योगदान दिले आहे. हिंदुबहुल भारत शंकराचार्यांसाठी राष्ट्रीय दुखवटा जाहीर करणार नाही, तर कुठे करणार ? असा प्रश्न करत गेल्या 70 वर्षांत काँग्रेसी नेत्यांनी हिंदूंच्या धर्मगुरूंचा अपमानच केला आहे. आता हिंदुत्ववादी मोदी शासन काळात धर्मगुरूंचा यथोचित सन्मान होईल अशी आशा आहे, असेही श्री. शिंदे या वेळी म्हणाले. 

श्री. रमेश शिंदे,राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.(संपर्क : 99879 66666)

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी