नांदेड| मराठा मित्र मंडळातर्फे गणेश हरकरे हे गेल्या २६ वर्षापासून आयोजित करत असलेल्या मानाच्या दहीहंडी स्पर्धेत चौफळा युवा दहीहंडी मंडळाने एकावर एक पाच थर लावून दहीहंडी फोडल्यानंतर धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते अकरा हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
चौफाळा भागातील सर्वात जुन्या असलेल्या दहीहंडी स्पर्धेचे उद्घाटन भाजपा महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश खोमणे, जिल्हा सरचिटणीस विजय गंभीरे व दिलीप ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी, ओबीसी मोर्चा अध्यक्ष व्यंकटेश जिंदम, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष अकबर खान पठाण, नंदू गाजूलवार हे उपस्थित होते. प्रमुख अतिथींचा शाल व पुष्पहार देऊन संयोजका तर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रवीण साले यांनी असे सांगितले की, शिंदे फडणवीस सरकारने दही हंडीला खेळाचा दर्जा दिल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर उत्साहाचे वातावरण पसरले आहे. दरवर्षी या स्पर्धा गणेश हरकरे घेत असल्याबद्दल महेश खोमणे यांनी त्यांचे आपल्या भाषणातून कौतुक केले. दिलीप ठाकूर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना गणेश हरकरे यांना नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिल्यास स्पर्धेची भव्यता वाढेल असा विश्वास व्यक्त केला. या स्पर्धेसाठी पवन यादव, गंगाधर बडवणे, अकबर पठाण, जय मातादी पान शॉप यांच्यातर्फे रोख पारितोषिके ठेवण्यात आली होती.चौफाळा युवा, मराठा,पंचशील ,ओम साई, सुलटेकडी, चौफाळा या सहा दहीहंडी मंडळांनी या स्पर्धेत भाग घेतला.
ढोल ताशाच्या गजरात अतिशय चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत सर्व संघांनी प्रयत्नाची पराकाष्टा केल्यानंतर चौफळा युवा दहीहंडी मंडळाने हंडी फोडताच जल्लोष करण्यात आला.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजू जाधव, चिंटू हरकरे, गजानन हरकरे, राजू हरकरे, सदाशिव हरकरे, शिवाजी हरकरे, शंकर भालेराव, कुंदन वट्टमवार ,मारुती अडकिने, मारुती बांद्रे, गणेश बत्तलवार ,गजानन कु-हाडे ,पप्पू इंदुरकर, पिंटू शेवाळे यांनी परिश्रम घेतले.