कोलामपोड येथे नागूबाई जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांसमवेत तिरंगा फडकवितात -NNL

तेलंगणाच्या सीमेवर आदिवासी पाड्यामध्ये घरोघरी तिरंगाचा उत्सव


नांदेड।
तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या किनवट तालुक्यातील कोलामपोड या अतिदुर्गम आदिवासी कोलामवस्तीवर आज "घरोघरी तिरंगा" चा अभिनव शुभारंभ करण्यात आला. चारी बाजूने डोंगर रांगेत विसावलेल्या तब्बल 23 कोलाम वस्ती व इतर आदिवासी पाडे या उत्सवात हिरीरीने सहभागी झाले. 

अवघ्या १५ उबंरठयाच्या कोलामपोड येथील या उत्सवाला साक्षीदार होण्यासाठी आमदार भिमराव केराम, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, तहसिलदार डॉ. मृणाल जाधव, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, गटविकास अधिकारी सुभाष धनवे आदी उपस्थित होते.

गावातील जेष्ठ महिला नागुबाई अर्जून टेकाम ही महिला गावातील इतर महिला समवेत आपल्या दाराला तिरंगा लावण्यासाठी सज्ज झाली. सडे आणि रांगोळीने सजलेल्या खांबाला तीने तिरंगा लावून देश प्रेमाची एक नवी ऊर्जा दिली. "या देशाची आदिवासी महिला राष्ट्रपती पदावर विराजमान झाली आहे. याचा सर्वांना आम्हाला अभिमान आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व देशाप्रती कृतज्ञता म्हणून आम्हाला हा तिरंगा उत्सव साजरा करताना विशेष आनंद असल्याच्या भावना" नागुबाईने आपल्या तोडक्या भाषेत सांगितल्या. 

किनवट येथील आदिवासी विकास प्रकल्प मार्फत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व घरोघरी तिरंगा हा उपक्रम प्रत्येक पाड्यावर साजरा होण्याच्या दृष्टीने आम्ही नियोजन केले. प्रकल्पातील प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी स्वतः एकेक पाडा निवडून त्या ठिकाणी आदिवासी बांधवांसमवेत घरोघरी तिरंगा उत्सव साजरा केल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण एच पूजार यांनी दिली.

यावेळी मान्यवरांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. गावातून, विविध पाडयामधून विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली काढून अवघा परिसर देशभक्तीमय केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगवान बिरसा मुंडा, शामादादा कोलाम यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन केले.

लिंबगुडा येथील रहिवाशी व शासकीय आश्रमशाळा तलाईगुडा येथे इयत्ता नववीत शिकणाऱ्या आदिम कोलाम समाजातील जयश्री भीमराव पुरके ही जवाहर नवोदय विद्यालयात प्रविष्ठ झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. शासकीय आश्रम शाळा तलाईगुडा येथील विद्यार्थिनी व तलाईगुडा येथील युवकांनी आदिवासी ढेमसा नृत्य सादर करून मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी ग्रामस्थ राजाराम मडावी यांनी मनोगत व्यक्त केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी आभार मानले. याप्रसंगी बालविकास प्रकल्पाधिकारी अश्विनी ठकरोड, महाजन अर्जून टेकाम, गावातील ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी आदिवासी निरीक्षक स्मिता पहुरकर, संदीप कदम, केंद्र प्रमुख प्रतापसिंग राठोड, मुख्याध्यापक सचिन चव्हाण, जी. व्ही. चव्हाण, शंकर नागोशे , हमीद सय्यद , विनोद जक्कीलवाड, अभि. सचिन येरेकर, विस्तार अधिकारी एस.आर. शिंदे आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी