नांदेड| जिल्ह्यातील विविध विकासाच्या प्रश्नांसदर्भात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सूचनेनुसार काँग्रेसचे शिष्टमंडळ सोमवारी (दि. ८) नांदेड दाैऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून विविध मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या पूरपरिस्थितीमुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या हानीची माहिती देऊन शेतकऱ्यांना मदत करावी तसेच शहरासह जिल्ह्यातील मंजूर झालेल्या विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. शिष्टमंडळात जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व आजी, माजी लोकप्रतिनिधी तसेच शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.