किनवट, माधव सूर्यवंशी| बंजारा सोनार समाजाचा माझा आदर्श समाज महामेळावा येथील कलावती गार्डनमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून यानिमित्त समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तर शांतीलालजी अडाणे यांना मरणोत्तर समाजरत्न देऊन सन्मानित केले आहे. किनवट सारख्या मागास दुर्गम भागात पहिल्यांदाच बंजारा सोनार समाजाच्या वतीने माझा आदर्श समाज महामेळावा व गुणवंत विध्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन किनवट माहूर रोडवरील कलावती गार्डन येथे 7 ऑगस्ट करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी उत्तमजी माळवी होते तर धरमसिंगजी डसाने व बाबुरावजी सकवान यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले व्यासपीठावर प्रेमसिंग सकवान,अनिल रूनवाल, जितेंद्र मुंडावरे, डॉ रमेश मांडण, अशोक सकवान,अभिमन्यू रूनवाल, प्रेमसिंग मुंडावरे, डॉ मांगीलाल अडाने गणपत रूनवाल, जयवंत सकवान,विनोद रूनवाल,पवन माळवे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. बंजारा समाजाचा एक अविभाज्य घटक म्हणून बंजारा सोनार समाज ओळखला जातो. उदरनिर्वाहाचे साधन म्हणून सोन्या चांदीचे अलंकार बनवून भारतीय संस्कृतीची कायम जोपासना करणाऱ्या या समाजाला शासनाकडून कोणत्याही सोयी सवलती मिळत नाहीत. व्यावसायिक व त्यांच्याकडे काम करणारे कारागीर यांची अवस्था बिकट आहे.
त्यांच्या आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी ठोस उपाययोजना झाल्या पाहिजे असे प्रतिपादन उत्तमजी माळवी यांनी अध्यक्षीय समारोप करताना केले. समाजानेही समाजाच्या हितासाठी एकसंध राहून शासनाशी लढा देण्याचे आवाहनही त्यांनी केले. सिंधुताई मोहरे,अश्विनी मोहरे यांनी बंजारा सोनार समाजातील परंपरा,रूढीबद्दल तसेच वाढती व्यसनाधीनतेवर भाष्य केले तर बाबुरावजी सकवान यांनी मुलींचे विवाह व महिलांच्या प्रश्नावर प्रबोधन केले. याप्रसंगी सुंदर मुंडावरे, सुरेश रूनवाल, सुलोचना गणेश माळवे, दिलीप मांडण,उज्वला मुंडावरे यांनीही आपापले विचार मांडले.
प्रास्ताविक भाषणातून नितीन मोहरे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विशद करत समाजाच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक दुरावस्थेबद्दल विस्तृत माहिती दिली. महामेळाव्या निमित्त 45 गुणवंत विद्यार्थ्यांचा पाल्यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तर शांतीललाजी अडाणे यांना मरणोत्तर समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अनेकांना समाज भूषण देऊन गौरविण्यात आले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश मुंडावरे, अश्विनीताई मोहरे व डॉ अजय मोहरे यांनी केले तर नितीन मोहरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माझा आदर्श समाज समूहातील सर्व सभासदांनी अथक परिश्रम घेतले या महामेळाव्यास मराठवाड्यासह विदर्भ व तेलंगाना राज्यातून समाजबांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.