समन्वय सभेत सर्व विभागांचा आढावा
नांदेड। गट विकास अधिकारी यांनी आपल्या विभागांतर्गत सर्व अधिकारी व कर्मचा-यांशी समन्वयाने कामे करावित. तसेच विविध योजनांचे उदिष्ट विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले.
आज बुधवार दिनांक 3 आँगस्ट रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली एमजीएम काँलेज येथील सभागृहात समन्वय सभा घेण्यात आली, यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना , उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, डॉ. नामदेव केंद्रे, व्ही.आर. पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख व सर्व गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, उप अभियंता, विस्तार अधिकारी पंचायत यांची उपस्थिती होती.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या वतीने दिनांक 11 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर झेंडा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या निमित्त व्यापक प्रसिद्ध देऊन सर्व नागरिकांना सहभागी करून अमृत महोत्सवाचा हा सोहळा व्यापक स्वरूपात साजरा करावा. यासाठी तिरंगा झेंडा विक्रीसाठी स्टॉल उभे करावेत, संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे, चर्चासत्राचे आयोजन, शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रभात फेरी, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमासह आदी उपक्रम घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
जल जीवन मिशन अंतर्गत जल उत्सव साजरा करण्यात येणार असून यासाठी 8 ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांना याविषयी माहिती द्यावी. जिल्हास्तरावर 100% नळ जोडणी झालेल्या गावांचे ठराव घेऊन संकेतस्थळावर अपलोड करावेत. वैयक्तिक नळ जोडणीसह शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य व केंद्र उपकेंद्र येथे नळ जोडणी द्यावी. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शंभर टक्के वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक संकलन, संस्थात्मक शौचालय पूर्ण असणाऱ्या गावांना हागणदारीमुक्त अधिक म्हणून घोषित करावे.
या संदर्भाने एसबीएम 2.0 या ॲप मध्ये फोटो अपलोड करावेत व तसा ठराव घेऊन ही गावे घोषित करावीत. सांडपाणी व घणकचरा व्यवस्थापनाचे आराखडे आँगस्ट अखेर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. कोरोना लसीकरणासाठी शिल्लक राहिलेल्या नागरिकांना तसेच ज्यांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत अशा पात्र नागरिकांना बूस्टर डोस देण्याचे नियोजन करून शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करावेत, असे आवाहन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
यावेळी त्यांनी महिला व बाल विकास, महाराष्ट्र जिवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नरेगा, कृषि, ग्राम पंचायत, समाजकल्याण, पशुसंवर्धन, पाणी पुरवठा, स्वच्छ भारत मिशन, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आदीं विभागांचा आढावा घेतला. या बैठकीला महिला बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माधव सलगर, उप शिक्षणाधिकारी बंडू आमदुरकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकर, कार्यकारी अभियंता अमोल पाटील, कृषि अधिकारी तानाजी चिमनशेट्टे यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, उप अभियंता, विस्तार अधिकारी यांची उपस्थिती होती.