नांदेड। सीटू संलग्न असंघटित कामगार संघटनेचे काकांडी तर्फे तुपा विभाग अध्यक्ष कॉ.गोपीनाथ देशमुख हे दि.२८ जुलैपासून जि.प.समोर आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी जि.प. समोर सीटूच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन देखील सुरू आहे. परंतु मागण्या मान्य होत नसल्याने सीटूचे कामगार व पदाधिकारी दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहेत.
मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या आंदोलनातील मागण्या सोडविण्यात येत नसल्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितस व शिक्षण विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत जिल्हा परिषदेसमोर दि.३ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता तीव्र निदर्शने करण्यात आली.काकांडी येथील शेतकरी श्री देविदास देशमुख यांना रोहयो अंतर्गत सिंचन विहीर मंजूर आहे. त्याविहिरीचे काम पूर्ण झाले असून त्यांचे तात्काळ बिल अदा करावे व तत्कालीन ग्रामसेवक अशोक कावळे यांच्यावर तसेच बिडीओ वर कारवाई करावी. केलेल्या कामाचे झिरो मस्टर केलेल्या सर्व यंत्रणेची चौकशी करावी. ग्रामसेवकास बीडीओ व वरिष्ठ पाठीशी घालत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
तसेच बोगस शिक्षण संस्था प्रजा बालक विद्या मंदिर गांधीनगर नांदेड या शाळेवर कारवाई करण्याचे पत्र जिल्हाधिकारी यांनी काढले आहे परंतु शिक्षणाधिकारी (प्रा.) व गटशिक्षणाधिकारी पं.स.नांदेड यांनी अध्याप शाळा सील केली नसल्यामुळे आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्या शाळेवरील सहशिक्षिका अशा माधवराव गायकवाड व शिक्षक केशव रामजी धोंगडे यांची फसवणूक करून त्यांना तीस वर्षे विना पगार राबवून घेतले आहे. त्यांना केलेल्या कामाचा मोबदला देण्यात यावा. आदी मागण्या अनेक दिवसांपासून करण्यात येत आहेत.शिक्षणाधिकारी व शिक्षण विभागाचा मुर्दाबाद च्या घोषणा देऊन उद्धार करण्यात आला.
मौजे सोमेश्वर,खुरगाव,चिखली, नांदुसा येथील मागणी केलेल्या सर्व अर्जदारांना घरकुल देण्यात यावे, रेशन कार्ड देण्यात यावे ह्या इतरही मागण्या करण्यात आल्या आहेत.
या निदर्शने आंदोलनाचे नेतृत्व कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.मारोती केंद्रे, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.जयप्रकाश काकांडीकर, कॉ.जयराज गायकवाड,कॉ.सुंदरबाई वाहुळकर, कॉ.दामू सरोदे कॉ.शोभाबाई बर्वे कॉ.नागनाथ पवार, कॉ.बबन वाहुळकर, गजानन देशमुख आदींनी केले आहे. सदरील निदर्शने आंदोलनात शेकडो कामगार उपस्थित होते.