नांदेड| सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीय असून विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत या प्रकारांमध्ये विलक्षण वाढ झालेली आढळून येते. नुकताच नागपंचमीचा सण साजरा करण्यात आला व त्याचे औचित्य साधून सर्पदंशांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे या हेतूने सर्पदंश जागृतीपर माहिती निनाद फाउंडेशन, नांदेडतर्फे दि.७ ऑगस्ट २०२२ रोजी मरळक येथील शेतकऱ्याना देण्यात आली. या प्रसंगी ५० गरजू शेतकरी बांधवांना रबरी गम बुटांचे वाटपही करण्यात आले. या उपक्रमाचे हे सलग दुसरे वर्ष असून मागील वर्षी हा उपक्रम मुखेड येथे राबविण्यात आला होता.
गम बुटांच्या वापरामुळे शेतात काम करत असताना पायावर सर्पदंश होण्यास आळा बसतो. तसेच फवारणीच्या वेळी विविध रसायनांमुळे पायाच्या त्वचेवरील होणारे दुष्परिणाम टाळता येतात. बराच काळ दमट व ओल्या वातावरणात उघड्या पायांनी काम केल्यास विविध विकार जडू शकतात. गमबुटांच्या नियमित वापराने हे टाळणे सहज शक्य आहे. गमबुटांचे असे अनेकस्तरीय फायदे लक्षात घेऊन जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी त्यांचा उपयोग करावा, असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.अनुराग लव्हेकर यांनी या प्रसंगी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चंद्रशेखर बासवाडेकर, गजानन लासिनकर, आशिष कनकुडते, धुंडीराज देशमुख, पाटोदेकर, डॉ.संदीप दरबस्तवार, गजानन मुधोळकर, सिद्धार्थ बुक्तरे यांनी परिश्रम घेतले. बालाजीराव कदम सरपंच, गंगाधरराव कदम, सुदाम कदम, बळीराम कदम, आनंदराव कदम, शंकरराव कदम, भिवाजी कदम, चंद्रप्रकाश पोहरे व मरळक येथील इतर मान्यवर ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते.