नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत लातूर येथील दयानंद कला महाविद्यालयाची खेळाडू कु. सोनल सावंत यांनी आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले आहे.
यापासून इतरही विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि विद्यार्थ्यांनाही आर्थिक मदत व्हावी या हेतूने विद्यापीठाने कू. सोनल यांना २ लक्ष रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसा ठराव व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्यासह व्यवस्थापन परिषदेच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत हा ठराव घेण्यात आला आहे.
विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व शैक्षणिक नियोजनावर नेहमीच कटाक्षाने लक्ष दिले जाते. विद्यार्थ्यांमध्ये खेळाबाबत विशेष रुची निर्माण होण्यासाठी त्यांना योग्य सोयी-सुविधा पुरविणे आवश्यक आहे. यासाठी खेळाडुंच्या पौष्टिक आहार व इतर भत्यांमध्ये विशेष वाढ करण्यात आलेली आहे. आंतर महाविद्यालय, आंतर विभागीय, सेंटर झोन, आखिल भारतीय, पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ, खेलो इंडिया व आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, क्रीडा महोत्सव या क्रीडा स्पर्धेत व प्रशिक्षण शिबिरास सहभागी खेळाडुंच्या पौष्टिक आहार व दैनिक भत्यामध्ये भरीव अशी वाढ करण्यात आलेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा खेळांकडे कल वाढेल आणि त्याचबरोबर विद्यार्थी मोठ्या स्पर्धेत खेळण्यासाठी तयार होतील. अशी आशा क्रीडा विभागाचे संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार यांनी व्यक्त केली.