शिक्षणासोबत नवीन पिढीला देशभक्तीची धडे देण्याची गरज - माजी पालकमंत्री डी.पी.सावंत -NNL


नांदेड।
आपल्या देशाला जे स्वातंत्र्य मिळाले आहे त्याचा इतिहास नवीन पिढीसमोर आला पाहिजे. शिक्षणासोबत तरुणांमध्ये देशभक्तीचे धडे देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी पालकमंत्री डी.पी.सावंत यांनी व्यक्त केले.  

श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेडच्या वतीने जरा याद करो कुर्बानी, गाथा स्वातंत्र्याची स्मरण बलिदानाचे या कार्यक्रमाचे आयोजन येथील कुसूम सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमात देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शहीद परिवारातील सदस्यांचा व नांदेडमधील भारतीय सैन्यात ज्यांना शौर्यपदक प्राप्त झाले आहे अशा माजी सैनिकांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.  या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर जयश्रीताई पावडे, शहीद परिवारातील सदस्य सुभाष पाटील, अनुज थापर, किरणजीतसिंघ संधू, जनाब आश्‍पाक खान, अमेय पिंगळे, अमरसिंह आझाद, शारदा भवन एज्युकेशन कार्यकारिणीचे सहसचिव उदय निंबाळकर, कोषाध्यक्ष रावसाहेब शेंदारकर, कार्यकारिणी सदस्य नरेंद्र चव्हाण, सुप्रसिद्ध लेखिका प्रियंका चौधरी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना माजी पालकमंत्री डी.पी.सावंत म्हणाले की, देशाचा अमृत महोत्सव साजरा करताना घरोघरी तिरंगा हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. प्रत्येकाच्या मनात तिरंगा पाहिजे. देशाला हे स्वातंत्र्य मिळाले ते सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी अनेक वीरांनी क्रांतिकारकांनी दिलेल्या बलिदानातून हे स्वातंत्र्य मिळाले आहे. भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आजच्या नवीन पिढीसमोर आणण्याची गरज आहे. त्यासाठी श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीने हा महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. आणि हा उपक्रम प्रत्येक वर्षी राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या विरांनी बलिदान दिले आहे. त्या सर्व विरांची यशोगाथा नवीन पिढीसमोर आणण्याची गरज आहे. आजच्या तरुण पिढीला स्वातंत्र्याच्या इतिहासाच्या बाबतीत खरी माहिती समोर आणताना जे चूक आहे ते चूक आणि जे बरोबर आहे ते बरोबर हे सांगण्याची आवश्‍यकता आहे. भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यासाठी तरुणांमध्ये देशभक्ती रुजविण्याकरिता अशा प्रकारचे उपक्रम हाती घेण्यात येणार असून देशभक्ती म्हणजे आपण आपला कायदा पाळला पाहिजे, आपली कर्तव्ये, जवाबदारी पार पाडणे हीच खरी राष्ट्रभक्ती आहे. आपण सर्वांनी जात, पात सर्व मतभेद विसरून हे स्वराज्य पुढे नेणे आणि टिकवणे गरज आहे, असे माजी मंत्री डी.पी.सावंत यांनी सांगितले.

यावेळी बोलताना महापौर जयश्री पावडे म्हणाल्या की, भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास नवीन पिढीसमोर आणताना राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेली तरुणपिढी तयार करण्याची गरज आहे. आजची परिस्थिती पाहता कांही संकट आले की, लष्कराची मदत घ्यावी लागत आहे. शिक्षणासोबत सामाजिक, राष्ट्रभक्ती तरुणात रुजली पाहिजे त्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम हाती घेण्याची गरज आहे. कोणतेही संकट देशावर, समाजावर आले तर लष्कर ज्या प्रमाणे धावून येते त्याप्रमाणे तरुण पिढी आली पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव ॲड. उदयराव निंबाळकर म्हणाले की, ब्रिटीशांनी आपल्या भारताचे राजकीय, आर्थिक, सामाजिक फार मोठे नुकसान केले.  यावेळी त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पंढरपूर येथील वास्तव्यातील आठवणींना उजाळा दिला. या प्रसंगी लेखिका प्रियंका चौधरी यांनी लिहिलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन माजी मंत्री डी.पी.सावंत व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य नरेंद्र चव्हाण यांनी केले. सदरील कार्यक्रमात शहीद परिवारातील सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शहीद भगतसिंग, शहीद सुखदेव, शहीद महावीरसिंघ, क्रांतिसिंह नाना पाटील, शहीद राजगुरू, शहीद आश्‍पाकउल्ला खान यांच्याविषयी माहिती दिली.  कार्यक्रमात माजी मंत्री डी.पी.सावंत यांच्या हस्ते करणजितसिंघ संधू, खालिद खालिजा खाँ, अनुज थापर, सुभाष पाटील, जनाब आश्‍पाक, अमेय पिंगळे यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच माजी सैनिक कॅप्टन किशनराव कपाळे, सार्जन्ट रामराव थडके, कॅप्टन प्रकाश कस्तुरे, कॅप्टन विठ्ठल कदम, मेजर सखाराम लुटे, सुभेदार गोविंद भालेराव, ज्ञानेश्‍वर डुमणे यांचा सत्कार करण्यात आला. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी