जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बुधवारी रानभाजी महोत्‍सवाचे आयोजन - जिल्‍हाधिकारी डॉ. विपिन -NNL


नांदेड|
भारतीय स्वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवा निमित्‍त व जागतिक अदिवासी दिनाचे औचित्‍य साधून रानभाजी महोत्‍सवाचे आयोजन बुधवार 10 ऑगस्‍ट 2022 रोजी सकाळी 10 ते सायं. 6 या कालावधीत जिल्‍हाधिकारी कार्यालय परीसरात केले आहे. या महोत्‍सवात शहरातील ग्राहकांनी सहभाग घेवून लाभ घ्यावा. तसेच थेट शेतकऱ्यांकडून रानभाजी खरेदी करावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे. 

मानवी आरोग्‍यामध्‍ये सकस अन्‍नाचे अनन्‍यसाधारण महत्‍व आहे. सकस अन्‍नामध्‍ये विविध भाज्‍यांचा समावेश आवश्‍यक आहे. सध्‍या परिस्थितीमध्‍ये रानातील म्‍हणजेच जंगलातील तसेच शेत शिवारातील नैसर्गिकरित्‍या उगवल्‍या जाणाऱ्या रानभाज्‍यांचे/ रानफळांचे महत्‍व व आरोग्‍यविषयक माहिती सर्वसामान्‍य नागरिकांना होणे आवश्‍यक आहे. रानभाज्‍यांचा समावेश हा त्‍या- त्‍या भागातील शेतकऱ्यांचे आहारात होत असतो. रानभाज्‍यांमध्‍ये विविध प्रकारचे शरीराला आवश्‍यक असणारे पौष्टिक अन्‍नघटक असतात. रानभाज्‍या नैसर्गिकरित्‍या येत असल्‍यामुळे त्‍यावर रासायनिक किटकनाशक / बुरशीनाशक फवारणी करण्‍यात येत नाही. त्‍यामुळे पुर्णपणे नैसर्गिक असल्‍याने या संपत्‍तीचा योग्‍य वापर आवश्‍यक आहे. शहरी लोकांमध्‍ये याबाबत जागृती करणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. यासाठी नांदेड येथे रानभाजी महोत्‍सव आयोजित करण्‍यात येत आहे.

यामध्‍ये जिल्‍हयातील शेतकरी गट व महिला गटांचा सक्रिया सहभाग या महोत्‍सवात राहणार आहे. विक्रीच्‍या ठिकाणी आपल्‍या जिल्‍हयातील उपलब्‍ध होणाऱ्या सर्व रानभाज्‍यामध्‍ये कर्टुली, शेवगा, घोळ, चवळी, बांबूचे कोंब, दिंडा, टाळका, पिंपळ, मायाळ, पाथरी, अळु, कपाळफोडी, कुरडू, गुळवेल, तांदुळजा, रानमाठ, पांढरी वसु, गोखरु, बिव्‍याचे फुले,  उंबर, चिवळ, भुई आवळी इ. कंदभाज्‍या व सेंद्रीय हिरव्‍या भाज्‍या, फळभाज्‍या व फूलभाज्‍या व ड्रँगन फ्रुट रानफळांची व शेतकऱ्यांनी विविध उत्‍पादीत केलेला माल सेंद्रीय उत्‍पादने, गुळ, हळद, लाकडी घाण्‍याचे करडीचे तेल, मध, बांबुपासुन तयार करण्‍यात आलेल्या वस्‍तु, गहू, डाळीचे व यासोबत भुईमुगच्‍या शेंगा, मुगाच्‍या शेंगा व केळीचे वेफर्स यांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. शहरातील नागरिकांनी या रानभाजी महोत्सवाचा लाभ घेण्याचे जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्‍प संचालक (आत्‍मा) रविशंकर चलवदे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी