तब्बल 63 विद्यार्थ्यावर एकाच वर्गात बसुन शिक्षण घेण्याची वेळ
इस्लापूर/किनवट। किनवट तालुक्यातील इस्लापूर येथून जवळच असलेल्या पेसा अंतर्गत ग्रामपंचायत कुपटी (बु)येथील दोन शिक्षक असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एका वर्गाची टीन पत्रे मागील दोन वर्षांपूर्वी उडून गेल्याने येथील इयत्ता १ली ते ५ वी पर्यंतच्या 63 विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे.
येथील पालक वर्गातून वेळोवेळी शाळेच्या इमारतीच्या डाग डूजी व दुरुस्ती करण्यासाठी पाठपुरवठा करून देखील या इमारतीची दुरुस्ती न झाल्याने विद्यार्थ्यांना त्रास होत असून याचा फटका त्यांच्या शिक्षणावर होत असुन यामुळे पालक वर्ग चिंतीत आहे. एकीकडे शासनाकडून शिक्षण खात्यावर लाखो रुपये खर्च केले जात असून, येथील विद्यार्थी मात्र याला अपवाद ठरले आहेत.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणपत डुकरे व येथील पालकांनी शाळेला नवीन इमारत द्यावी . अशा मागणीचे निवेदन पंचायत समिती किनवट यांच्याकडे निवेदनाद्वारे वेळोवेळी मागणी केली होती. परंतु अद्यापही त्यांना प्रतिसाद मिळाला नसून विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसावे लागत आहे. मागील महिन्यात मुसळधार पावसाने शाळेच्या परिसरात चिखल साचल्याने पालकांनी वर्गणी करीत शाळेच्या पटांगणात स्वखर्चाने मुरूम देखील टाकला होता.
सदरील शाळेचे बांधकाम अत्यंत जुने असल्याने या वर्गाच्या भिंती देखील पडल्या असून, पत्र्याचे शेड उडून गेल्याने विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसुन शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. तसेच याच शाळेच्या परिसरात असलेल्या अंगणवाडीची इमारत देखील धोकादायक बनली असून, कुपटी (बु)येथील ग्रामपंचायतीचे मात्र याकडे साफ दुर्लक्ष असून, याकडे प्रशासनाने लक्ष देऊन नवीन इमारत बांधून द्यावी व विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणपत डुकरे, रामदास मोरे, श्रीराम धुमाळे, प्रल्हाद चांदोड,व पालकांनी केली.