दैनंदिन जीवनात कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण हवे :प्रीती सावला
पुणे। तेर पॉलिसी सेंटरच्या 'तेर ऑलिम्पियाड २०२२-२३' चे उदघाटन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडिया ( आयसीएआय ) च्या सेंट्रल काउन्सिल मेंबर प्रीती सावला यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने २५ ऑगस्ट, गुरुवारी सायंकाळी ४ वाजता झाले. तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक डॉ.विनिता आपटे,टाटा मोटर्सच्या सीएसआर विभागाचे उप सरव्यवस्थापक रोहित सरोज,मयुरेश कुलकर्णी उपस्थित होते. तेर ऑलिम्पियाड ही विद्यार्थ्यांसाठी निसर्ग,विज्ञान,पर्यावरण रक्षण विषयक प्रश्नमंजुषा स्पर्धा असून विजेत्यांना आकर्षक पारितोषिके दिली जातात.या उपक्रमाचे हे आठवे वर्ष आहे.
यावेळी बोलताना प्रीती सावला म्हणाल्या,'संस्कारक्षम वयात पर्यावरण जागृतीचा विचार विद्यार्थ्यांमध्ये पेरण्याचा हा उल्लेखनीय उपक्रम आहे. सामाजिक योगदानासाठी नवीन पिढी सज्ज होत आहे,ही चांगली गोष्ट आहे.आपल्याला निसर्गाची आवश्यकता आहे. पुढील पिढ्यांसाठी त्याचे रक्षण केले पाहिजे,म्हणून कार्बन उत्सर्जनाची काळजी केली पाहिजे. वीज निर्मितीसाठी कोळसा जाळला जातो,हे प्रदूषणाचे मोठे कारण आहे.
प्रदूषण करणाऱ्या देशांच्या यादीत भारत असणे ही चांगली गोष्ट नाही.विद्यार्थ्यांपासून सामाजिक संस्था,सरकार आणि उद्योगांची भूमिका महत्वाची आहे. आपली प्रत्येकाची भूमिका महत्वाची असून पृथ्वी वाचविण्यासाठी आपण योगदान दिले पाहिजे.खाण्या -पिण्याच्या सवयी,कपडे आणि दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टीचा वापर करताना कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा विचार केला पाहिजे. एनर्जी कॅल्क्युलेटर वापरून आपण रोजच्या वीज वापरावर नियंत्रण आणले पाहिजे'.
तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक डॉ.विनिता आपटे यांनी प्रास्ताविक केले.त्या म्हणाल्या 'या वर्षी ५ लाख विद्यार्थी या ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होतील असा विश्वास वाटतो.पर्यावरण विषयक जागृती होण्यासाठी हा उपक्रम देश पातळीवर आयोजित केला जात असून या ऑलिम्पियाड चे हे आठवे वर्ष आहे. दर वर्षी प्रतिसाद वाढत आहे. तेर ऑलिम्पियाड च्या www.terregreenolympiad.com या संकेतस्थळावर महिनाभर प्रश्नमंजुषा स्पर्धा सुरु राहणार आहे. 'टाटा मोटर्स चे रोहित सरोज म्हणाले,'तेर पॉलिसी सेंटर च्या पर्यावरण विषयक उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे,ही चांगली गोष्ट आहे.मानव आणि निसर्गाचे नाते दृढ होत राहिले पाहिजे. डोंगर,नद्या, परिसंस्था चांगल्या अवस्थेत राहिल्या पाहिजेत.त्यासाठी जबाबदारीची भावना वाढली पाहिजे'. निकिता महाडिक यांनी सूत्रसंचालन केले.