गुन्हा दाखल केल्याशिवाय प्रेत उचलणार नाही - मयताच्या कुटुंबीयांचा इशारा -NNL

नगरपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे सार्वजनिक बोअरची मोटार चालू करताना शॉक लागून मृत्यू


हिमायतनगर|
शहराचा कारभार पाहणाऱ्या नगरपंचायतीचा भोंगळ कारभार कोणत्या न कोणत्या कारणाने दररोज उघड होतो आहे. अश्याच भोंगळ कारभारामुळे सार्वजनिक पाणीपुरवठ्याची मोटारपंप चालू करताना शहरातील वॉर्ड क्रमांक ९ मधील गौतम पिंचा या नागरिकास शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना दि.२१ रोजी सायंकाळी घडली आहे. या घटनेला नगरपंचायतीचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करावे अन्यथा प्रेत उचलणार नाही असा पवित्र कुटुंबीयांनी घेतला आहे.


हिमायतनगर शहरातील सर्वच म्हणजे १७ वॉर्डातील सार्वजनिक बोअरच्या ठिकाणी स्टार्टरची अवस्था जीवघेणी झाली आहे. त्या ठिकाणी जोडण्यात आलेले वीज कनेक्शन उघडे असून, पाऊस पडताच परिसरात अर्थींग व करंट उतरत आहे. तसेच नगरपंचायतीचा अधिकारी व संबंधित पाणिपुराणतः विभागाची देखरेख करणारे जबाबदार कधीच सार्वजनिक बोअरच्या ठिकाणावर येत नाहीत. त्यामुळे कर्मचारी देखील बोअरच्या चालू - बंद करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने आत्तापर्यंत अनेक महिला, बालके व जेष्ठ नागरिकांना विजेचा शॉक बसला आहे. 


याबाबत अनेकदा नगरपंचायतीच्या संबंधितास सांगूनही नगरपंचायतीने नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतेही पाऊल उचलले नसल्याने आज हि जीवघेणी घटना घडली आहे. या घटनेमुळे सार्वजनिक बोअरवर पाणी भरण्यासाठी येणारी नागरिकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावरून नगरपंचायतीचा रामभरोसे कारभार चव्हाट्यावर आला असून, घटना घडूनही सकाळी ११ वाजता वृत्त लिहीपर्यंत नगरपंचायतीच्या एकही अधिकाऱ्याने मयताच्या कुटुंबीयांची भेट घेतली नाही. 

याकडे लक्ष देऊन आगामी काळात अश्या घटना शहरातील अन्य ठिकाणच्या बोअरवर होणार नाहीत यासाठी सुरक्षेच्या दृष्टिने योग्य ती पाऊले उचलून कर्मचाऱ्याकडून शहरातील जनतेला सुरळीत पाणी सोडण्याचे काम होणे  गरजेचे आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बी डी भुसनर यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पंचनामा केला आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या नपच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी निवेदन देऊन केली आहे. वृतांत लिहीपर्यंत पोलीस डायरीत या संदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, नातेवाईकांनी संबंधित नपच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा प्रेत उचलणार नाही असा पवित्र घेतला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी