हिमायतनगर। येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने "हर घर तिरंगा" उपक्रमांतर्गत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली एक हजार तिरंगा वाटप व जनजागरण अभियान क्रांती दिनाचे औचित्य साधुन गरजूंना 08 ऑगस्ट रोजी हिमायतनगर तालुक्यातील सरसम, पोटा, पारवा, सवना, सवना तांडा, हिमायतनगर, खडकी, टेंबी आदी गावात तिरंगा वाटप करून करण्यात आली.
या अभियानाचे मूख्य संयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे व सहकार्यक्रमाधिकारी डॉ. एल. बी. डोंगरे यांनी केले होते. या अभियानाला स्टाफ सेक्रेटरी डॉ. डी. के. कदम, क्रीडा संचालक डॉ. दिलिप माने व कार्यालयीन अधिक्षक श्री संदिप हरसूलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच या तिरंगा वाटप व जनजागरण अभियानामध्ये महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका तसेच कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थीनींना सामावून घेण्यात आले होते.
तसेच या अभियानाला यशस्वी करण्यासाठी दोन प्राध्यापकांचा एक ग्रुप व त्यांच्या समवेत दहा तिरंगा वारीस म्हणून विद्यार्थ्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांना संपूर्ण राष्ट्रध्वजाची संहिता व जबाबदारीची जाणीव करून दिली व त्या अनुषंगाने संबंधित वॉरियर्स ग्रुपनी सर्वप्रथम गावात जाऊन सरपंच, ग्रामसेवक तथा ग्रामस्थांच्या भेटी घेऊन गरजूंना राष्ट्रध्वज देऊन 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये आपल्या घरावर तिरंगा राष्ट्रध्वज फडकवण्याचे सांगून त्यांचे नियम समजावून सांगितले. व त्यांना राष्ट्रध्वजाच्या जबाबदारी जाणिव करुन दिली.
संबंधित वॉरियर्स नी त्या कुटुंबाला सहकार्य करुन त्यांचे नाव, गाव, मोबाईल नंबर, घर नंबर, सही सह संपूर्ण पत्ता तसेच तिरंग्यासह एक फोटो घेऊन संबंधित माहिती गोळा करण्याचे आश्वासन दिले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचा रासेयो विभाग, क्रीडा विभाग, सांस्कृतिक विभाग तसेच कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका, कार्यालयीन कर्मचारी, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व महाविद्यालयाचे तिरंगा वारियर्स म्हणून नेमलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून परिश्रम घेतले.