सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचे नेतृत्व हरपले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL


मुंबई|
शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक, माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन अत्यंत धक्कादायक आणि वेदना देणारे आहे. त्यांच्या निधनाने  मराठा आरक्षणासह, सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचे नेतृत्व हरपले अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मी आजच मुंबई येथे बैठक बोलावली होती. त्या बैठकीला मेटे उपस्थित राहणार होते. या बैठकीपूर्वीच काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले. त्यांच्या निधनाने मराठा आरक्षण चळवळीचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारक आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावर ते तळमळीने बोलायचे. या स्मारकाच्या कामासाठी राजकीय इच्छाशक्ती निर्माण करून निधीची तरतूद करून घेण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात जीव गमवावा लागलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरी मिळावी, त्यांचं योग्य पुनर्वसन व्हावं तसेच आंदोलन करताना दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, गरीब लोकांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी ते कायम लढत राहिले. मेटे यांच्या निधनाने मराठा समाजाचा एक बुलंद आवाज आज हरपला आहे. या धक्क्यातून सावरण्याचे बळ मेटे कुटुंबियांना मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना. माजी आमदार विनायक मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक हरपला

मध्यमवर्गीयांमध्ये देखील शेअर बाजाराच्या माध्यमातून गुंतवणुकीची आवड निर्माण करणाऱ्या, शेअर बाजाराचे गुंतवणूक तज्ज्ञ राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.

शेअर बाजार हा केवळ मोजक्या श्रीमंत लोकांसाठी नसून  सर्वसामान्यांनादेखील शेअर बाजारात नियोजनबद्ध गुंतवणूक करून श्रीमंत होता येतं हे झुनझुनवाला यांनी दाखवून दिलं. स्वतः त्यांनी सुद्धा अतिशय कमी पैशाची गुंतवणूक करून आपली या क्षेत्रातली सुरुवात केली होती, आणि गुंतवणुकीचा अभ्यास करून एक उंची गाठली. शेअर बाजारातील गुंतवणूक म्हणजे केवळ सट्टा बाजारातली गुंतवणूक नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये या गुंतवणुकीचे मोठे योगदान असते. त्यादृष्टीने झुनझुनवाला यांनी मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना दिशा दाखविली. राकेश झुनझुनवालांनी सुचवलेल्या शेअर्सकडे आणि त्यांच्या सल्ल्याकडे सर्वसामान्य गुंतवणूकदार लक्ष ठेवून असायचे. विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्यासाठी त्यांनी  अकासा एअर ही विमान सेवाही सुरु केली होती. त्यांच्या निधनाने निश्चितपणे गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक हरपला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी