मुंडेंचा दौरा संपूर्णतः राजकीय स्वार्थाचा ठरला.

कमळचा ‘कमळे’ वाडी प्रवास



नांदेड(रमेश पांडे)गारपीटग्रस्तांना दिलासा देण्याच्या नावाखाली जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेले भारतीय जनता पक्षाचे मराठवाड्यातील नेते खा. गोपीनाथराव मुंडे यांनी मुखेड तालुक्यात राठोड बंधूंनी दिलेल्या मेजवाणीचा आस्वाद घेत ‘एका दगडात दोन..’ या न्यायाने कामगिरी बजावली. दरम्यान राठोड बंधूंनी आमंत्रण न देताच मुंडेच्या कमळाने ‘कमळेवाडी’ गाठल्याने मुंडेंचा हा दौरा संपूर्णतः राजकीय स्वार्थाचा ठरला.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा जबर तडाखा बसल्यानंतर पार ‘गार’ झालेल्या शेतकर्‍यांचे अश्रु पुसण्याची जणु पुढार्‍यांना आयती संधी मिळाली. प्रत्येकाला गारपीटग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आणि शेतकर्‍यांच्या भेटीगाठी घेण्याची घाई झाली. एरवी शेतकर्‍यांचे प्रश्न बासनात गुंडाळून राजकीय स्वार्थ साधणार्‍या पुढार्‍यांची गारपीटग्रस्त भागात जणू जत्राच भरल्याचे दिसून येते.

 भारतीय जनता पक्षाने डी.बी.पाटील यांची उमेदवारी जाहीर करून प्रतिस्पर्धी कॉंग्रेसवर उमेदवारी जाहीर करण्याच्या प्रक्रियेत मात केली. परंतु अंतर्गत कलहात सुकलेल्या कमळाला ङ्गुलविण्याची जबाबदारी आता खा. गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे आली. गारपीटग्रस्त भागाची पाहणी करताना काही हाती लागते का? या विचाराने खा. मुंडे जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले खरे परंतु गारपीटग्रस्तांपेक्षा त्यांना उमेदवार डी.बीं.च्या विजयाची चिंता भारी!. या दौर्‍यात मुखेड तालुक्यातील कॉंग्रेसच्या असंतुष्ट समजल्या जाणार्‍या राठोड बंधूंची भेट म्हणजे ‘सोने पे सुहागा’ ठरणार याची जाणीव झाल्याने ते राठोड बंधूंच्या भेटीसाठी कमळेवाडीला पोहोचले. रात्री नव्हे! मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास मुंडेचा लवाजमा कमळेवाडीत पोहोचताच राजकीय चर्चेला उधाण तर आलेच शिवाय तर्कवितर्कही सुरु झाले. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसतर्ङ्गे अशोक चव्हाण असोत की त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.अमिता चव्हाण, ‘कमळेवाडीतून’ कमळ ङ्गुलविण्याचा आग्रह मात्र मुंडे यांनी राठोड बंधूंकडे लावून धरल्याची माहिती मिळाली. एवढेच नव्हे तर केवळ मुंडे यांच्या आग्रहाखातर राठोड बंधूंनी या मेजवाणीची व्यवस्था केल्याचेही सांगण्यात आले. ‘लोकसभेला तुम्ही अन्‌ विधानसभेला आम्ही’ या समीकरणावर सकारात्मक चर्चा झाल्याचे बोलले जात असले तरी चव्हाणांची साथ सोडणे राठोड बंधूंसाठी सोपे नाही, अशी कॉंग्रेसच्या गोटात मानले जाते.

एकंदरीत खा. मुंडे यांच्या या दौर्‍यामुळे गारपीटग्रस्तांना काय मिळाले? यापेक्षा खा. मुंडे यांना राठोड बंधूंकडून काय मिळाले? हे मात्र आता लपून राहिले नाही. मुंडे यांना कमळेवाडीतून निमंत्रण नव्हते, ते स्वतःहून राठोड बंधूंच्या भेटीला गेल्याचे स्पष्ट झाल्याने ‘मान न मान मै तेरा मेहमान, मर जाय किसान पर हो जाय खानपान’ असेच म्हणता येईल.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी