नांदेड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सरसकट अर्थसाह्य मंजूर करा - आ.मोहनराव हंबर्डे -NNL


नांदेड।
नांदेड जिल्हात अतिवृष्टी व ढगफुटीसदृश्य पावसामुळे शेतीपिकांचे आणि पडझडीमुळे घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जुलै महिन्यातच जिल्ह्यात सरासरी 90 टक्केच्यावर पाऊस झाला आहे. आधीच आर्थिक संकटाच्या खाईत लोटलेला शेतकरी या अतिवृष्टीमुळे प्रचंड मानसिक तणावात आहे. 

नैसर्गिक आपत्तीमुळे खचून गेलेल्या शेतकर्‍यांना धीर देण्यासाठी नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ सरसकट नुकसान भरपाई उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नांदेडचे जिल्हा अधिकारी इंटनकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

आ. हंबर्डे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सोयाबीनचा पेरा 80 टक्के पेक्षा अधिक आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात खरीपाची पेरणी झालेली आहे. परंतु जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून कधी संततधार तर कधी मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. परिणामी अनेक गावात, शेतात पाणीच पाणी झाले. शेत परिसराला शेततळ्यांचे स्वरुप आले आहे. पावसामुळे पिके खरडून गेली. 

शिवाय गोगलगायींच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचे पीक नष्ट होऊन गेले. आधीच कर्ज काढून पेरणी केलेल्या शेतकर्‍यांपुढे हे नवे संकट निर्माण झाले आहे. या संकटातून शेतकर्‍यांना बाहेर काढणे गरजेचे आहे. त्यासाठी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित प्रशासकीय यंत्रणेला द्यावेत आणि सरसकट तात्काळ अर्थसाह्य मंजूर करावे, अशी मागणी आ. मोहनराव हंबर्डे यांनी केली आहे. 

यासोबतच पावसामुळे जिल्ह्यातील अनेक घरांची पडझड झाली आहे, संसारोपयोगी साहित्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.  अनेकांचे ससार उघड्यावर आहेत, त्यांनाही विशेष अर्थसाह्य मंजुर करून शासनाने दिलासा द्यावा, अशीही मागणी आमदार हंबर्डे  यांनी आपल्या निवेदनात केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी