कायदा व सुव्यवस्था अबाधित रहाण्यासाठी पोलिस व पत्रकारांनी प्रयत्न करण्याची गरज - बी डी. भुसनर -NNL

संख्याबळ कमी असताना देखील नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी आमचे पोलीस तत्पर, गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरु 


हिमायतनगर, अनिल मादसवार|
शहर व ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहाण्यासाठी पोलिस, पत्रकार व जनतेने सकारात्मक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन हिमायतनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी.डी.भुसनर यांनी व्यक्त केले. ते हिमायतनगर येथील पत्रकारांसोबत आज डी.२७ जुलै रोजी दुपारी संपन्न झालेल्या चर्चासत्राच्या बैठकीत बोलत होते.


सर्वप्रथम उपस्थित पत्रकार आणि पोलीस निरीक्षक यांनी एकमेकांचा परिचर करून घेतला. त्यानंतर त्यांनी शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांशी सुसंवाद साधत नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्यांबाबत सखोल चर्चा झाली. यावेळी पत्रकारांनी शहरातील मोकाट जनावरे, रुग्णालय परिसरातील बाजार, तालुक्यात घडणाऱ्या चोरी, लूटमार, अवैद्य धंद्यासह ठिकठिकाणी ग्रामीण भागात अवैद्य दारू विक्रीच्या धंद्याचा प्रश्न उपस्थित केले. महिला - मुलींना होणारा रोडरोमिओंचा त्रास खुप वाढलेला आहे. भरधाव वेगात गाड्या पळविणे शाळेच्या बाहेर व रस्त्यावर थांबून मुलींची छेड काढणे याबाबत उपाययोजना कराव्यात. अनेक क्लासेस व शाळा - कॉलेजचच्या बाहेर कांही ठराविक तरुण मुलींची छेडछाड करतात. मोबाईलमध्ये मुलींचे फोटो काढून घेतात अशा तरुणांना पोलिसी खाक्या दाखवणे गरजेचे आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पोलीस कार्यवाहीसाठी तत्पर आहे .आपण सुचविलेल्या सूचनांना न्याय देण्यात येईल. तसेच स्थानिक समस्यांबाबत नगरपंचायत प्रशासनाला पत्रव्यवहार केला जाईल असे आश्वासन पत्रकारांना दिले. 

यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले कि, तालुक्यातील चोरीच्या घटना आळा घालण्यासाठी गावागावात ग्रामसुरक्षा दल नेमने गरजेचे आहे. त्यामुळे गावागावात काय चालले याची माहिती होऊन नागरिक व पोलिसात सुसंवाद वाढेल. आणि आपल्या गावची आपणच सुरक्षा केल्याचे समाधान मिळेल. तसेच चोरीच्या घटना टळतील, यामुळे नागरिकांच्या समस्या पोलिसांना व पोलिसांच्याही कांही अडचणी नागरिकांनी समजून घेणे सोईचे होईल. तसेच सामाजिक जबाबदारी पत्रकारांनी पार पडायला हवी, चांगल्या गोष्टीला न्याय देऊन समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी पत्रकारांनी लेखणी झिजवावी. पोलिस हा सुध्दा समाजाचाच एक घटक आहे. समाजात वावरताना यालाही कांही अडचणी येत असतात त्या समजून घेणे आवश्यक आहेत.


समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून समस्या सोडविण्यासाठी आमचे पोलीस तयार आहेत. रात्रीच्या वेळी जेंव्हा पोलिस आपल्या भागात येतील तेंव्हा नागरिकांनी पोलिसांना सहकार्य गरजेचे आहे. आपल्या तालुका परिसर जास्त लांब असल्याने ज्या भागात घटना घडली. त्यावेळी दुसऱ्या टोकावर आमचे कर्मचारी असल्यामुळे घटनास्थळी येण्यास विलंब होतो. मात्र पोलीस उपस्थित होऊन घटनेचा तपशील जाणून घेतात. त्यामुळे त्या भागातील गुन्हे आपोआपच कमी होत असतात. या भागातील सर्वच नागरिक व पत्रकार बांधव सजग आहेत, तात्काळ पोलसांना पाचारण करतात. रात्री जागे असतात असे जेंव्हा चोरांना माहिती होते तेंव्हा त्या भागात चोरटे फिरकण्याचे धाडस करत नाहीत. आम्हा पोलिसांची गस्त सुरु आहे त्यामध्ये आणखी वाढ करुन नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी प्रयत्न करू. 

हिमायतनगर तालुका व शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी आहे. मात्र नागरिकांना सेवा देण्याचे आमचे कर्तव्य आहे. यासाठी पोलिस मित्र म्हणून आपण पत्रकार आणि नागरिकांनी देखील सहकार्य करावे. आपल्या भागात कधी कोणता अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा. एखादा गुन्हा करुन कोणी पलायन करताना आढळला तर तात्काळ त्याच्या वाहनाचा क्रमांक घ्या म्हणजे आम्हाला तो ट्रेस करणे सोपे होईल. मागील काळातील चोरीच्या घटना लक्षात घेता शहर व तालुका परिसरातील गस्त वाढविलेली आहेच. सध्या जुलै महिना संपण्याच्या वाटेवर आहे, आगामी काळ सण उत्सवाचा आहे. लहान मोठ्या चोर्‍यांचे प्रमाण वाढले असून, पुढील काळात हे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आपापल्या घरातील विजेचे दिवे रात्री चालु ठेवावेत. पुढील महिन्यात गणेशोत्सवसह श्रावण महिना सुरु होतो आहे. शहरात वेगवेगळी गणेश मंडळे आहेत त्यातील तरुणांनी पोलिस मित्र गट बनवावे आणि आपापल्या भागात गस्त करावी. 

चोरी व इतर घटना टाळण्यासाठी ज्यांना शक्य आहे त्यांनी आपापल्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. जमले तर किमान आपापल्या सोसायटीत तरी महत्वाच्या ठिकाणी नागरिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवुन घ्यावेत. नगरपालिकेला ही शहरातील सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याच्या सुचना आम्ही केलेल्या आहेत. मुलींच्या छेडछाडीचे प्रकाराबाबतच्या गुन्ह्यात आरोपींची कधीच गय केली जाणार नाही. कुठे अशा प्रकारे घटना घडत असेल तर तात्काळ आम्हाला कळवा अशांवर कठोर कारवाई केली जाईल. रस्त्यांच्या कडेला बेशिस्तपणे वाहने लावणे, विना नंबर प्लेट व अपुर्ण कागदपत्रे असणार्‍या गाड्यांवर कारवाई केली आहे. ती चालुच राहील आमच्याकडून जे जे शक्य आहे ते ते आम्ही नागरिकांच्या सेवेसाठी अवश्य करु असेही पोलीस निरीक्षक भुसनर यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले. एकुणच पोलिस मित्र या नात्याने पत्रकारांमध्ये एकमेकांच्या विचारांची देवाण-घेवाण व्हावी, एकमेकांना सहकार्य करावे हि अपेक्षा ठेऊन आज पोलीस आणि पत्रकारांची सुसंवाद बैठक संपन्न झाली. यावेळी अनेक जेष्ठ, श्रेष्ठ, नवनिर्वाचित प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स, आणि सोशल मीडियाचे प्रतिनिधी, पत्रकार, वार्ताहर, संवाददाता, संपादक मंडळी उपस्थित होते.

नवनिर्वाचित पत्रकारांनी व्रत लिहिताना त्याची सत्यता तपासून पाहूनच वृत्तांकन करावे आपल्या एखाद्या चुकीच्या घटनेने चांगल्या माणसांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. पोलिसांनी देखील एखाद्य पत्रकाराने चुकीची बातमी लावली तरी वाईट वागणुक न देता समाज द्यावी. जेणेकरून त्यांच्या वागण्यात सुधारणा होऊन पोलीस आणि पत्रकारामधील समन्वय ठेवणे शक्य होईल. पत्रकारांनी एखादी बातमी सत्य असली तरी समाजात तेढ निर्माण करणारी असल्यासत्याकडे दुर्लक्ष करावे असे मत जेष्ठ पत्रकार कानबा पोपलवार यांनी व्यक्त केले. बैठकीचा समारोप डीएसबीचे कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानून केला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी