माहूर| सततच्या पावसामुळे आणि नदी नाल्याला पूर येत असल्यामुळे माहूर तालुक्यात जोरदार पाऊस पडत असल्याची बाब लक्षात घेऊन माहूरगड दर्शनासाठी केले बंद करण्यात आले आहे. विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहत असलेल्या धनोडा येथील पैनगंगेला पूर आल्याने विदर्भातून माहूरकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
दरम्यान, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी श्री रेणुकामाता मंदिर भाविकांना दर्शनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी सकाळपर्यंत माहूर तालुक्यात ८६.४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पैनगंगा नदीने रौद्ररूप धारण केले असून विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे. दोन्हीकडील वाहतूक रोखण्यात आली असूaन तहसीलदार किशोर यादव, आपत्ती व्यवस्थापन पथकासह अहोरात्र पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी पूर पाहण्यासाठी नदीकाठावर गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले.