नांदेड| महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस सुरू असून सुद्धा नांदेड शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाने मनपाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
शहरातील हिंगोली गेट,महावीर चौक,आनंद नगर, सोमेश कॉलनी,मिल रोड,बस स्टँड तसेच गुरुद्वारा परिसरातील काही भागात पाणी साचून राहत आहे. शहरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले आहेत. गटारीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचला आहे. त्यामुळे अनेक परिसरात विशेष करून नदीकाठच्या भागात दुर्गंधी येत आहे.
नांदेड मनपाने ऐन पावसाळ्याच्या समोर अनेक रस्त्यांची कामे काढून सर्व सामान्य जनतेला त्रास देण्याचे आणि जनतेच्या करातून मिळालेल्या पैश्याचा अपव्यय करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष अजित पाठक यांनी केला आहे.