डोळ्यात मिरची पूड टाकून लूटमार केल्याप्रकरणी दुसऱ्या आरोपीला हिमायतनगर पोलिसांनी केली अटक -NNL

तालुक्यात व इतर ठिकाणी झालेल्या लुटमारीच्या घटनांचा तपास लावण्यास मदत होणार 


हिमायतनगर|
तालुक्यात मागील काही महिन्यात तोंडावर काळा कपडा बांधून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपीकडून डोळ्यात मिरची पूड टाकून दुचाकीस्वाराना लुटण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्या घटनेतील आरोपीच्या शोधात पोलीस असताना काल रात्री मिळालेल्या गुप्त माहितीवरून हिमायतनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने छापा टाकून लुटमारीच्या घटनेतील दुसऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी पोलिसांनी एकाला अटक केली होती. या आरोपीची कसून चौकशी केल्यास तालुक्यात व इतर ठिकाणी झालेल्या लुटमारीच्या घटनांचा तपास लावण्यास मदत मिळणार आहे.  

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यात मागील तीन महिन्यात चोरी, लूटमार, दरोडे, दुकान फोडून रक्कमेसह साहित्य लंपास करणे, दुचाक्या चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना जून महिन्यात दिनांक १६ रोजी सायंकाळी १६.२५ वाजेच्या सुमारास, हिमायतनगर त पार्डी  रस्त्यावरील आईवाळा चौकाच्या अलीकडे मुख्य रोडवर धडली होती. या घटनेत शिवाजी सखाराम भालेराव हा पार्डी येथुन महिला बचत गटाची मिटींग संपवुन परत हिमायतनगर कडे येत होता. ते दुचाकीवरून आईवळा चौकाचे अलीकडे रोडवर येताच पाठीमागून दुचाकीवर बसून आलेल्या तीन आनोळखी आरोपीने भालेराव यांची मोटार सायकल आडवुन तोंडावर चटणी फेकुन अश्लील शिवीगाळ केली. तेंव्हा भालेराव आपले दुचाकी जागेवर सोडुन जवळील बॅग घेवुन शेतात पपळून जाण्याच्या प्रयत्न करत होते, मात्र अचानक हातातील बॅग खाली पडली.

यावेळी भालेराव यांचे मागे लागलेल्या अनोळखी इसमाने फिर्यादीची बॅग व मोटार सायकलची चावी घेवुन निघुन गेले. फिर्यादीचे बॅग मध्ये सॅमसंग कंपनीचा मोबाईल किंमती १० हजार रूपये व एक मंत्रा डिव्हाईस थम मशीन किंमती २ हजार ७०० रूपयाची स्टॅपलर असे एकुण १२ हजार ७०० रूपयाचे साहित्य जबरीने चोरून नेले. अशी फिर्याद शिवाजी पि. सखाराम भालेराव, वय २४ वर्षे, व्यवसाय नौकरी स्वतंत्र मायक्रो फायनान्स रा. संभाजीनगर डॉ. लक्ष्मण पवार बिल्डींग हिमायतनगर ता. हिमायतनगर जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुरनं १४०/२०२२ कलम ३९२, २९४, ३४  भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

यापूर्वी हिमायतनगर तालुक्यातील धानोरा येथील एका शेतकऱ्याची दुचाकी अडवून डोळ्यात मिरची पूड टाकून २ हजार २०० रुपये नगदी रक्कमेसह किराणा सामान लंपास केल्याची घटना दि.४ में रोजी घडली होती. त्यापूर्वी हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा शिवार येथे भारत फायनान्स इन्कल्युजन लि. शाखा हिमायतनगर मध्ये काम करणारा फिल्ड ऑफिसरला तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून दुचाकीवरून आलेल्या २ अज्ञाताने १ लक्ष १५ हजारांची रक्कम असलेली बैग लुटून पोबारा केला होता. या घटनेचा तपस होतो ना होतो, दि.१६ जून रोजी आईवाळा चौकात आणखी एक लुटमारीची घटना घडली होती. 

लागोपाठ अश्या घटना घडत असल्याने हिमायतनगर पोलिसांनी डोळ्यात मिरची पूड टाकून लूटमार करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी रात्रगस्त सुरु केली. डोळ्यात मिरची पूड टाकून लूटमार करणाऱ्यापैकी दुसरा आरोपी शे.मुजाहिद उर्फ शेरू शेख मौलाना वय २० वर्ष हा घरी आल्याची माहिती गुप्त खबरीमार्फत मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी, जमादार अशोक सिंगणवाड, जिंकलवाड, नागरगोजे यांनी हिमायतनगर शहरातील घरी छापा टाकून मोठ्या शिताफीने आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक भुसनर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एन बी चौधरी हे करत आहेत. 

हिमायतनगर पोलिसांनी या घटनेतील अब्दुल बबलू नामक एका आरोपीस यापूर्वी अटक केली आहे. त्यानंतर रात्री एकाला अटक केल्यानंतर हिमायतनगर पोलिसांनी लूटमार आणि दुचाकी चोरी अश्या दोन घटना उघडकीस आणल्याने पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे. तालुक्यात मागील तीन महिन्यात घडलेल्या घटना लक्षात घेता पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीतांची कसून चौकशी केल्यास इतर साथीदार आरोपी हाती लागून अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी