नांदेड। जिल्हाभरात मागील आठ दिवसांपासून पाऊस झाल्याने हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. आठ दिवसांनंतरही शेतातील पाणी ओसरले नाही. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस निखिलेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
मृग नक्षत्राच्या सुरुवातीला बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीची कामे आटोपून घेतली. परंतु त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे कोवळी पिके कोमेजून जाण्यास सुरुवात झाली होती. त्यातच हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यासह जिल्ह्यात जवळपास आठ दिवस पावसाची संततधार सुरू होती. दरम्यान जिल्ह्यातील बहुतांश मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले तर काही भागात पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिकांची मोठी हानी झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.
सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरीही अनेक भागांतील शिवारामध्ये अजूनही पाणी साचून आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पीक परिस्थितीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस निखिलेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.