काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र
मुंबई| जून महिना संपून जुलै महिना सुरु झाला तरी राज्यातील मराठवाड्यासह काही भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाने दडी मारल्याने अनेक भागात खरिपाचा पेरा अजूनही झालेला नाही. विशेषतः विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पावसाअभावी पेरा खूपच कमी झाला आहे. पेरणीची ही परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना मोफत बि-बियाणे व शेतातील इतर कामांसाठी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात पुढे म्हटले आहे की, शेतकरी नेहमीच सुलतानी किंवा आस्मानी संकटाचा सामना करत असतो. शेतकऱ्याला आधार देऊन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे सरकार म्हणून आपले कर्तव्य आहे. पावसाअभावी ज्वारी, उडीद, सोयाबिन, तूर, भुईमूग, बाजरी, नाचणी पिकांचा पेरा अत्यंत कमी झाल्याचे दिसत आहे. खरिपाचा पेरा वेगाने व वेळेत व्हावा हे लक्षात घेता पेरणीसाठी मोफत बि-बियाणे देण्यात यावे तसेच पेरणीसह शेतातील इतर कामासाठी रोख मदत देण्यात यावी. त्यासाठी संबंधित विभागांना तात्काळ निर्देश द्यावेत..