‘स्वारातीम’ विद्यापीठात सामाजमाध्यमांतील मजकुराची सत्यता पडताळणी या विषयावरील ऑनलाईन कार्यशाळा संपन्न -NNL


नांदेड|
माध्यमांनी चुकीची माहिती प्रसारित होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केले.  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुल आणि युनिसेफ यांच्यावतीने आयोजित सामाजिक माध्यमामधील बातम्यांची सत्यता कशी तपासावि या विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी दैनिक लोकमतचे संपादक नंदकिशोर पाटील, युनिसेफच्या महाराष्ट्राच्या प्रभारी स्वाती मोहपात्रा, फॅक्ट चेक कार्यशाळेच्या प्रशिक्षक श्रुति गणपत्ये, माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. दिपक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. उद्धव भोसले म्हणाले की, समाजात चुकीची माहिती गेली तर त्याचे विपरीत परिणाम होतात. त्यामुळे सामाजिक माध्यमे किंवा इतर कुठलीही माध्यमे यावर चुकीची माहिती जाणार नाही. याची खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. सामाजिक माध्यमावर लिखाण करताना आपल्यामुळे इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घेण्याची गरज आहे. असेही कुलगुरू उद्धव भोसले म्हणाले. सध्याचे जग हे माहिती तंत्रज्ञानाचे जग आहे या जगात कोण कशाचा वापर कशासाठी करतोय याचे भान माध्यमांनी ठेवणे गरजेचे आहे. सामाजिक माध्यमे वापरणारे हे एक प्रकारचे पत्रकारच आहेत. त्यामुळे या माध्यमावर येणारी माहिती लगेच फॉरवर्ड करण्यापूर्वी ही माहिती खरी का खोटी याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे असेही कुलगुरू डॉ. उद्धव भोसले म्हणाले. 

यावेळी बोलताना दैनिक लोकमतचे संपादक नंदकिशोर पाटील म्हणाले की, सध्याच्या माध्यमांच्या कार्यपद्धतीमुळे माध्यमांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक माहिती तपासून घेण्याची गरज आहे जर अशीच परिस्थिती राहिली तर काही दिवसानंतर सामाजिक माध्यमांविषयी अनेक समस्या निर्माण होतील. ही भीती टाळण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. समाज माध्यमे ही मानवी समूहाच भलं व्हावं यासाठी तयार करण्यात आलेली आहेत. ही माहिती कोण देते, कशासाठी देते त्यांचा उद्देश काय आहे हे तपासल्याशिवाय अशी माहिती फॉरवर्ड करणे अत्यंत धोकादायक आहे. याची जाणीव प्रत्येकाने ठेवण्याची गरज आहे असे  पाटील म्हणाले. 

सामाजिक माध्यमांचे प्रमुख कार्यालय परदेशात आहेत त्यामुळे या माध्यमांवर भारतीय कायद्यानुसार नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीच्या काळात आला. या माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याकरिता कायदा तयार करण्यात आला होता परंतु त्याचा वापर करता आला नाही असे पाटील यावेळी म्हणाले. सामाजिक माध्यमे वापरतांना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे असेही नंदकिशोर पाटील म्हणाले.  या कार्यशाळेत पत्रकार माध्यम क्षेत्रात जाणारे विद्यार्थी तसेच नागरिक यांना सामाजिक माध्यमे वापरताना त्यावरील संदेश फॉरवर्ड करताना हे संदेश तपासल्याशिवाय फॉरवर्ड करू नयेत चुकीच्या संदेशा मुळे अनर्थ घडू शकतात याची जाणीव करून देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केल्याचे कार्यशाळेचे आयोजक तथा माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. दिपक शिंदे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले. 

या कार्यशाळेचे प्रशिक्षक श्रुति गणपत्ये यांनी सामाजिक माध्यमांवर येणाऱ्या बातम्या, मजकूर या कशा पद्धतीने तपासाव्या  याची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. असे संदेश बनवणारे विशेष लाभ मिळवण्यासाठी संदेश बनवत असतात ते राजकीय, सामाजिक, आर्थिक किंवा इतर कुठलेही लाभ मिळवणे या दृष्टीने तयार केलेले असतात. कधी-कधी बदनामी करणे हा त्यामागचा उद्देश असतो ज्या कुणी असे संदेश फॉरवर्ड करणार असेल त्यांनी ते कसे तपासावे संदेश खरा की खोटा हे कुठल्या व्यासपीठावर जाऊन तपासावा याचे प्रात्यक्षिक श्रुती गणपत्ये  यांनी करून दाखवला कोविड-१९ च्या काळात समाज माध्यमांवर कोविड संधर्भात आलेल्या बातम्या पैकी २१४ टक्के बातम्या खोट्या होत्या. या बातम्या संदर्भात पोलिसात तक्रारी झाल्या होत्या म्हणून ही टक्केवारी कळली इतर बातम्यांची टक्केवारी जास्त असू शकते हेही त्यांनी सांगितले. 

अनेक वेळा व्यापारी उद्देशाने असे संदेश प्रसारित केले जातात. खोटे संदेश पसरवण्याच्या प्रकारात तेलंगाना, तामिळनाडू, उत्तर प्रदेश ही राज्ये आघाडीवर होती हेही त्यांनी दाखल्यासह स्पष्ट केले. आभासी पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमाला प्राचार्य गुरुबचन सिंग शिलेदार, प्राचार्य शिवशंकर पटवारी, डॉ. गोविंद घोगरे, प्रा. योगेश बोराटे, डॉ. रमजान मुलानी, डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. राहूल तौर, डॉ. चंद्र्कांत बाविस्कर, डॉ. संपत पिंपळे,  प्रशांत हटकर, डॉ. शशिकांत धांडे, कवयित्री हेमांगी पौल, डॉ. डी.एम. भोसले, डॉ. सचिन नरंगले, डॉ. कैलाश यादव, डॉ. बालाजी शिंदे यांच्यासह विद्यार्थी, पत्रकार, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रुति गणपत्ये यांनी कार्यशाळेनंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक अशी उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले तर आभार डॉ. सुहास पाठ्क यांनी मानले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी