नांदेड| किनवट परिसरात पैनगंगा नदीला पूर आला आहे. पुर्ण क्षमतेने नदी भरुन वाहत आहे. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीत येणारे पाण्याचे प्रमाण लक्षात घेता स्वाभाविकच पैनगंगेचे पाणी किनवटच्या नदी जवळील सखल भागात घुसले आहे.
या भागातील 200 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले असून प्रशासनातर्फे या लोकांना अन्नाची पाकिटे व इतर व्यवस्था केली जात असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किर्ती कुमार पुजार यांनी दिली. आज सकाळ पासून नांदेड-किनवट हा मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झालेला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.