शिक्षक व पालकाच्या समन्वयातूनच विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती शक्य - डॉ. लक्ष्मीकांत बजाज -NNL


नांदेड।
विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालकांचीही भूमिका महत्वपूर्ण असते. शिक्षक व पालकांचा योग्य समन्वय असल्यास निश्चित विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती शक्य असल्याचे प्रतिपादन राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे संचालक डॉ. लक्ष्मीकांत बजाज यांनी केले आहे.

 मुंबई येथील जय वकील फाउंडेशन च्या दिशा प्रकल्पाअंतर्गत येथील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात गुरुवार दि २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शिक्षक-पालक अभिमुखता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. लक्ष्मीकांत बजाज बोलत होते. व्यासपिठावर संस्थेचे सदस्य अंकित अग्रवाल, दिशा प्रकल्पाचे मराठवाडा समन्वयक साजिद मुल्ला, मुख्याध्यापक नितिन निर्मल, मुख्याध्यापक मुरलीधर पाटील, वसतिगृह अधीक्षक संजय शिंदे आदींची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना डॉ. लक्ष्मीकांत बजाज असे म्हणाले की, पालकांनी आपला पाल्य विशेष असल्याची जाणीव करुन घ्यावी. यानंतर आपल्या पाल्याची उपयुक्तता पाहून त्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आमच्या शाळेतील या सर्व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकसह सर्वांगीण प्रगतीसाठी शाळेतील शिक्षक परिश्रम घेत आहेत. मात्र केवळ शिक्षकावरच विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जबाबदारी असल्याचे समजून आपण अलिप्त राहिल्यास अपेक्षित यश प्राप्त होणार नाही यासाठी शिक्षकांसमवेत आपला समन्वय आवश्यक आहे. या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीसमवेतच त्यांच्यातील विविध अडचणी दूर करण्यासाठी संस्थेच्या वतीने शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत यात फिजिओ थेरपी, स्पिच थेरपी आदिचा समावेश असल्याचे त्यांनी सांगीतले.

यावेळी मुख्याध्यापक नितीन निर्मल म्हणाले की, सामान्य शाळेप्रमाणे मतिमंद शाळेसाठी अभ्यासक्रमच ठरवण्यात आला नव्हता. मात्र जयवकील फाउंडेशनच्या पुढाकारातून आता राज्यभर मतिमंदासाठी एकच अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता, वय व गरजा याचा विचार करुन यापूर्वीपासूनच आपल्या शाळेत अभ्यासक्रम राबविण्यात आला आतातर दिशा प्रकल्पाच्या माध्यमातून या अभ्यासक्रमाला नवीन “दिशा” मिळाली आहे. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जडणघडणीत शिक्षक व पालक यांचा संवाद आवश्यक असतो याच हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

याप्रसंगी राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे संचालक अंकित अग्रवाल, दिशा प्रकल्पाचे साजिद मुल्ला यांनी विचार मांडले. तर निरंकार कौर शाहू, बालिका बरगळ या पालकांनी आपल्या मनोगतात शाळेत रावविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची प्रशंसा करत आपल्या पाल्यात सकारात्मक बदल होत असल्याचे सांगत यापुढेही आपल्या पाल्याची शैक्षणिक प्रगती आणखी चांगली होईल असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष शिक्षक मुरलीधर गोडबोले तर उपस्थितांचे आभार कला शिक्षक मधुकर मनुरकर यांनी मानले. या कार्यक्रमास पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिति होती. कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी