नवीन नांदेड। स्वा.रा.ती.म.विद्यापीठाच्या वतीने कोरोनाच्या परिस्थिती नंतर पहिल्यांदाच उन्हाळी-2022 चे पदवी व पदव्युत्तर विभागाची लेखी परीक्षा घेण्यात आल्या. यासाठी अनेक विद्यार्थी व विद्यार्थी संघटनांनी अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही यासाठी ही उन्हाळी-2022 ची परीक्षा ऑनलाईन घेण्यासंदर्भात विनंती केली होती.
यासंदर्भात विद्यापीठाच्या वतीने कोणताही सकारात्मक प्रतिसाद आला नाही तरी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या निर्णयाचे स्वागत करत अभ्यासक्रम पूर्ण न होऊन व लिहिण्याची सवय मोडलेली असतेवेळी देखील परीक्षा दिली पण या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण न झाल्यामुळे नापास होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यांचे पुढील शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये. यासाठी "मास" विद्यार्थी संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव कबनुरकर यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले सर यांना निवेदनाद्वारे लेखी परीक्षेतील गुण व अंतर्गत गुण एकत्र करून पास करण्याचा निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे.
जेणेकरून या निर्णयाचा सर्व विद्यार्थ्यांना फायदा होईल व त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. अश्याच प्रकारचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देखील घेतलेला आहे. याची देखील आठवण कबनुरकर यांनी कुलगुरूंना करून दिली आहे. यावेळी श्रीकांत जाधव कबनुरकर यांनी कुलगुरू महोदय नक्कीच विद्यार्थी हिताचा निर्णय घेतील अशी आशा व्यक्त केली आहे व या निवेदनाची एक प्रत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नेटके सर यांना देखील दिली असल्याचे सांगितले.