नांदेड| महाराष्ट्रात नाट्यमय घडामोडींनंतर महाविकास आघाडीची सत्ता जाऊन विरोधीपक्ष सत्तेत आला. या सत्तांतरानंतर पुरोगामी चळवळीतील नेते तथा कार्यकर्ते सर्वसामान्य कार्यकर्ते, नेते आणि तमाम बुद्धिजीवी वर्गांचे दमन होत असल्याची भावना लोकांमध्ये आहे. यामध्ये राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक तथा सांस्कृतिक क्षेत्र प्रभावित होत आहे.
सत्तांतरानंतर दमनाच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला असल्याचे मत येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत डॉ. जगदीश कदम यांनी व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भगवान अंजनीकर, इसाप प्रकाशनाचे प्रकाशक तथा बालसाहित्यिक दत्ता डांगे, निर्मल प्रकाशनचे निर्मलकुमार सुर्यवंशी, विठ्ठलराव सूर्यवंशी, ग्रामीण कवी नागोराव डोंगरे, समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, साईनाथ रहाटकर आदींची उपस्थिती होती.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आणि डॉ. भगवान अंजनीकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील वर्कशॉप काॅर्नर परिसरातील निर्मल प्रकाशनाच्या कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बोलतांना डॉ. भगवान अंजनीकर म्हणाले की, गुरु आणि शिष्यांचे नाते अतुट आहे. गुरुने केलेले संस्कार शिदोरीप्रमाणे आयुष्यभर पुरतात. राजकीय सत्ता कुणाचीही असो भारताच्या गुरु शिष्य परंपरेची महिमा अगाध आहे आणि ती मानवी जीवन असेपर्यंत कायम आहे असेही ते म्हणाले. यानंतर उपस्थितांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देऊन मंगल कामना व्यक्त केल्या.