नांदेड| वीज वितरण कंपनीतील मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या बहुसंख्य मागण्या मान्य झाल्यामुळे गुरुवार दि.23 रोजीचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. माविकसंचे झोन अध्यक्ष शंकर घुले, झोन सचिव प्रमोद बुक्कावार यांनी एका पत्रकात ही माहिती दिली.
भोकर विभागातील प्रभारी अभियंता आर.एस. चितळे यांच्या मनमानी कारभारामुळे माविकसंच्या कामगारांवर मानसीक ताण येत आहे. तसेच त्या कामगारांचा छळ होत आहे. या कामगारांवर विनाकारण कारवाया केल्या जात आहेत. तेंव्हा प्रभारी अभियंता चितळे यांच्यावर कारवाई करावी यासह 17-18 मागण्यांसाठी गुरुवार दि.23 रोजी द्वारसभा व 30 जून पासून असहकार आंदोलन करण्याचा इशारा माविकसंने दिला होता. त्यानंतर महावितरणचे नांदेडचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी संघटनेला चर्चेसाठी बोलाविले.
तेंव्हा मुख्य अभियंता पडळकर, ए.जी.एम. सुशिल पावसकर, कामगार अधिकारी महेंद्र बागुल व एच.आर. नागेश मुरकुंदे आणि माविकसंकडून केंद्रीय उपाध्यक्ष सिध्दार्थ पाटील, झोन अध्यक्ष शंकर घुले, सचिव प्रमोद बुक्कावार यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी चितळे यांच्या कारभाराच्या चौकशीसाठी अधिक्षक अभियंता बाबुसिंग जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या समितीचा अहवाल अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्याचे आश्वासन मुख्य अभियंता पडळकर यांनी दिले.
सदर चर्चेच्यावेळी महिला कर्मचार्यांना नांदेड सर्कलच्या बाहेर पाठवू नये, अभियंते व जनमित्र यांच्यावर विनाकारण होणार्या कारवाया थांबवाव्यात, लाईन स्टॉफ कर्मचारी यांना 8 तास कामावर ठेवावे त्यांना अतिरिक्तचे काम देवू नये अशा मागण्या माविकसंने केल्या आहेत. माविकसंच्या बहुसंख्य मागण्या मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी मान्य केल्या आहेत. त्यामुळे दि.23 पासूनचे आंदोलन मागे घेण्यात आले. असे झोन अध्यक्ष शंकर घुले व प्रमोद बुक्कावार यांनी स्पष्ट केले. यावेळी जवळपास अडीचशे कर्मचारी व कामगार उपस्थित होते. दरम्यान जे. डी.कदम यांनी माविकसंमध्ये प्रवेश केला आहे.