नांदेड/हिमायतनगर| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता स्व.परमेश्वर भोयर यांच्या मृत्यू बाबत संशय असल्याची तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेला २० दिवस लोटले असताना देखील तपास शून्य असल्याने कुटुंबियातून नाराजी व्यक्त केली जात आहे. या घटनेच्या तपासासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भयान्वये योग्य ती चौकशी करावी अश्या सूचना विशेष पोलिस महानिरीक्षक नांदेड यांना दिल्यानंतरही तपासाला गती मिळत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. पोलिसांनी तातडीने या घटनेचा तपास लावावा आणि आरोपीना जेरबंद करावे अन्यथा आम्हाला नाईलाजाने पोलिसांच्या विरीधात कुटुंबियांना घेऊन आमरण उपोषणाला बसावे लागेल. असा इशारा मयताचे वडील बाबूराव भोयर गुरुजी यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
हिमायतनगर शहरातील सामाजिक कार्यकर्ता मयत परमेश्वर भोयर हे दि.२० रोजी लग्नसोहळ्याला जातो म्हणून घरातून गेले होते. ते घरी परत आले नाहीत, त्यामुळे घरच्यांनी सर्वत्र शोधाशोध केली मात्र त्यांचा कुठेच शोध लागला नाही. दुसऱ्या दिवशी दि.२१ रोजी त्यांचा मृतदेह हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर मुख्य कमानीच्या समोर असलेल्या बालाजी ट्रेडर्स दुकानाच्या पाठीमागील चेंबरमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळून आला. त्यांचा मृतदेह ज्या अवस्थेत सापडला त्यावरून त्यांचा खून करून प्रेत तिथे टाकण्यात आल्याचा संशय ग्रामस्थांसह त्यांच्या नातेवाईक व मित्रमंडळींनी व्यक्त केला. तशी तक्रार देखील हिमायतनगर पोलिसांना देऊन या घटनेचा पारदर्शक पद्धतीने तपास लावून आरोपीना अटक करण्यात यावी अशी मागणी केली होती.
दरम्यान खुनाच्या घटनेच्या तपासासाठी शहर बंदची हाक देऊन नातेवाईकांनी याबाबत पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांची भेट घेतली होती, मात्र काहीच फरक पडला नसल्याने आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी सामाजिक कार्यकर्ता परमेश्वर भोयर यांच्या संशयास्पद मृत्यूचा जलद गतीने तपास हवा अशी मागणी एक निवेदन महाराष्ट्र राज्याचे ग्रहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मुंबई येथे भेटून केली आहे. या घटनेचा योग्य दिशेनं व लवकरात लवकर तपास करण्यात याव्यात अश्या सूचना नांदेडच्या पोलीस यंत्रणेला गृहमंत्र्यांनी दिल्या होत्या. यामुळे तरी परमेश्वर भोयर यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास जलद गतीने आणि पारदर्शक पद्धतीने होईल अशी अपेक्षा होती.
हिमायतनगर शहरास उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांनी दि.३० रोजी शहरवासीयांची भेट घेऊन या घटनेचा तपासासाठी हालचाली सुरु करण्यात आल्याचे सांगून विशेष पथक गठीत केल्याची माहिती दिली. त्यामुळे शहर बंद मागे घेण्यात आला. यास १२ दिवस लोटले मात्र योग्य तो तपास करून या खुनाच्या घटनेचा छडा लावण्यात पोलीस अपयशी ठरल्याचे दिसते आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी काय तपास केला याची माहिती न देता उलट मयताच्या नातेवाईक असलेल्या आम्हा कुटुंबीयांची दिशाभूल करत उलट आम्हालाच प्रश्नोत्तर विचारून त्रस्त करत असल्याचा आरोप मयताचे वडील बाबुराव भोयर गुरुजी यांनी केला आहे. आम्ही या घटनेचा तपास लावून गुन्हेगारांना शिक्षक होईपर्यंत स्वस्त बसणार नाही. हिमायतनगर बंद तात्पुरता रद्द करण्यात आला होता, त्यामुळे यापुढे कुटुंबियांना घेऊन पोलिसांच्या कारभाराच्या विरोधात आमरण उपोषणाला बसण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. हि वेळ येऊ न देता पोलिसांनी आमच्या परमेश्वर भोयर या मुलाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांचा तपास लावून तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे.