नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परभणी येथील उपकेंद्राच्या उभारणीसाठी शासनाने १३.७ हे.आर. (३३ एकर) शासकीय गायरान जमीन उपलब्ध करून दिली आहे. सदर जमीन परभणी शहरालगत मौजे जांभ येथे आहे. असा आदेश परभणी येथील जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी विद्यापीठाच्या कुलसचिवांना नुकताच निर्गमित केला आहे.
विद्यापीठाचे उपकेंद्र परभणी येथे सुरू करण्यासाठी बऱ्याच वर्षापासून तेथील पदाधिकारी प्रयत्नशील होते. सध्या विद्यापीठाचे उपकेंद्र परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये, त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या छोट्याश्या जागेमध्ये चालू आहे. आता विद्यापीठाला ३३ एकर जागा उपलब्ध झाल्यामुळे भविष्यात भव्य-दिव्य असे उपकेंद्र उभारण्यात येईल.
या उपकेंद्रामुळे अनेक शैक्षणिक संकुलासह कार्यालयीन कामकाज परभणी येथे चालू करण्यात येईल. विद्यापीठाच्या कामासाठी परभणी येथील विद्यार्थ्यांना नांदेड विद्यापीठामध्ये येण्याची गरज पडणार नाही. ३३ एकरमध्ये लवकरच शैक्षणिक संकुले आणि प्रशासकीय कामकाज भव्य अशा इमारतीमध्ये सुरू करण्यात येईल. अशी आशा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी व्यक्त केली. त्याबरोबरच कुलगुरू महोदयांनी महाराष्ट्र शासन, परभणी येथील स्थानिक पदाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाचे ३३ एकर जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.