नांदेड। पंजाब आणि महाराष्ट्रात बंधुभाव जोपासन्यात यशस्वी ठरत असलेल्या नानक साई फाऊंडेशनच्या संत नामदेव "घुमान" यात्रेला पंजाबचा मानव सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे.
पंजाब च्या बटाला येथिल सहारा क्लब या सामाजिक क्षेत्रात कार्यरत सेवाभावी संस्थेने घुमान यात्रेला हा पुरस्कार जाहीर केला आहे, संत नामदेव महाराज यांच्या 752 व्या जन्मशताब्दी निमित्ताने हा पुरस्कार नोव्हेंबर मध्ये नामदेव नगरी घुमान येथे प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती सहारा क्लबचे अध्यक्ष जतींदर कड तथा सेक्रेटरी सरदार मास्टर जोगिंदरसिंघ यांनी दिली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पहिली संत नामदेव ग्रंथ यात्रा काढण्याचा मान नानक साई फाऊंडेशन ला मिळाला होता. साहित्य संमेलनाच्या अवचित्याने सुरू झालेल्या घुमान यात्रेमुळे पंजाब आणि महाराष्ट्र राज्यात बंधुप्रेमा सोबत दोन राज्यातील सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत झाले आहेत, राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यात नानक साई फाऊंडेशन घुमान यात्रेच्या माध्यमातून यशस्वी ठरली आहे, यासाठी हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे सहारा क्लब ने म्हटले आहे.
या पुरस्काराचे स्वरूप रोख 21 हजार रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल शिरोपाव असे आहे. नोव्हेंबर च्या 4 तारखेला हा पुरस्कार घुमान नगरीत प्रदान केला जाणार आहे अशी माहिती नानक साई फाऊंडेशन चे चेअरमन पंढरीनाथ बोकारे यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.